( रत्नागिरी )
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्हा वाहतूक शाखेची करडी नजर असून, अशांवर दंडात्मक कारवाई केली जाते. गेल्या जानेवारी ते डिसेंबर २०२३ या वर्षभरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ७०,३६० चालकांवर वाहतूक शाखेने कारवाई करून ४ कोटी ७० लाख ७७ हजार ४५० रुपयांचा दंड आकारला आहे. यात सर्वाधिक कारवाया वाहतुकीला अडथळा करणे आणि प्रवेश निषिद्ध असलेल्या ठिकाणी वाहने उभी केलेल्यांना करण्यात आला आहे.
नागरिकांच्या तसेच वाहनांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने राज्याच्या परिवहन विभागाकडून वाहतुकीची नियमावली घालून देण्यात आली आहे. मात्र, काही वाहनचालक त्या नियमांचे पालन न करता वाट्टेल तशी वाहने चालवितात. यामुळे प्रसंगी गंभीर अपघाताला कारणीभूत ठरतात. काही वेळा निरपराधांचाही यात बळी जातो. तसेच बेशिस्तपणे वाट्टेल तिथे वाहने उभी केल्याने वाहतुकीलाही अडथळा होतो. अशा बेशिस्त वाहनचालकांना जरब बसविण्याच्या दृष्टीने जिल्हा वाहतूक शाखेकडून वाहतुकीला शिस्त लागावी, या उद्देशाने कडक कारवाई करण्यात येत आहे.
गेल्या वर्षभरात या कार्यालयाकडून विविध नियम मोडणाऱ्या ७०,३६० वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यात विनाहेल्मेट असलेले दुचाकीस्वार, सीटबेल्ट न लावता कार चालविणारे चालक, गाडी चालविताना मोबाइलवर संभाषण, सिग्नल तोडणारे, वाहनाचा विमा नसलेले, फॅन्सी नंबरप्लेट, मालवाहतुकीच्या वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणारे, मनाई असलेल्या जागेत वाहन उभे करणारे, ट्रिपल सीट नेणारे दुचाकीस्वार आदींचा समावेश आहे.
नियम मोडणाऱ्या या वाहनचालकांमध्ये वाहतुकीला अडथळा करणाऱ्या चालकांची संख्या सर्वाधिक १४,२७६ इतकी असून ९३ लाख ६८ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. त्याखालोखाल ‘नो एंट्री’चा फलक असलेल्या जागी वाहने लावणाऱ्यांची संख्या १०,८६७ इतकी आहे. त्यांच्यावर ७०,१०,५०० रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. तर अन्य प्रकरणातील ३१,४४२ चालकांवर २,०८,३९,६३२ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. एकंदरीत गेल्या वर्षभरात ७०,३६० बेशिस्त वाहनचालकांवर जिल्हा वाहतूक शाखेने ४,७०,७७,४५० रुपयांचा दंड आकारला आहे.
वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर अपघातांची संख्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल. कारवाईची पाळी आणण्यापेक्षा चालकांनी नियमित नियमांचे पालन करावे,
– विजय जाधव, सहायक उपनिरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रत्नागिरी