(मुंबई)
अलिकडल्या काळात नेत्यांना फोन करून अश्लील अथवा नको ते वाईट बोलायचे आणि त्याची रेकॉर्डिंग समाजमाध्यमांवर टाकण्याची पद्धत सुरू झाली आहे. असा प्रकार करणार्या हिरोंची हिरोगिरी काढायला वेळ लागत नाही. आम्ही संयमाने वागतो, त्याचा गैरफायदा कुणीही घेऊ नये, अशा लोकांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असा सज्जड दम फडणवीसांनी दिला.
कायदा व सुव्यवस्थेवरील 260 च्या प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, अलिकडे काही लोकांनी सर्व पक्षीय नेत्यांना फोन करण्याचा एक नवा धंदा सुरू केला आहे. कुणी समाजाच्या नावाने तर अन्य कुठल्या कारणाने लोकप्रतिनिधींना फोन करतो आणि शिविगाळ करतो. त्यानंतर ती रेकॉर्डिंग समाजमाध्यमांवर टाकतो. काही लोकांचा हा व्यवसाय झाला आहे. अनेकवेळा एकच व्यक्ती सर्व पक्षीय नेत्यांना फोन करत असते, असा प्रकार खपवून घेतला जाणार नाहीत अशा शब्दांत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इशारा दिला.
सार्वजनिक आयुष्यात वावरताना लोकप्रतिनिधींशी कोणीही संपर्क करू शकतो आणि आपली तक्रार व अडचण सांगू शकतो. मात्र, धमकी, शिविगाळ, चुकीचे आरोप करण्याचा कोणालाही अधिकार नाही. लोकप्रतिनिधी रस्त्यावर पडलेले नाहीत. त्यांचा कोणी वाली नाही, असे कोणीही समजू नये. यापुढे लोकप्रतिनिधींसोबत असा प्रकार करण्याचा प्रयत्न कोणी केला, तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि वारंवार असा प्रकार करणारा एकच व्यक्ती आढळला, तर विशेष कायद्यान्वये कारवाई करण्याचे निर्देश देऊ, असा इशारा फडणवीसांनी यावेळी दिला.