( संगमेश्वर / प्रतिनिधी )
सध्या सगळेजण शेतीपासुन दूर पळण्याचा प्रयत्न करत असतात. पण, संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावातील श्री गणेश उत्पादक बचत गटाला कलिंगड लागवडीतुन चांगलीच गोडी मिळाली आहे. पारंपारिक पद्धतीची भात शेती करीत असताना सामूहिक शेतीचा संकल्प केल्यानंतर धामणी येथील तीन एकर क्षेत्रावर श्री गणेश उत्पादक बचत गट दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे शेतीमधील प्रयोग करत नेत्रदीपक कामगिरी करत आहे.
एक एकर क्षेत्रावर भाजीपाला घेतल्यानंतर दोन एक क्षेत्रावर या बचत गटाने यावर्षी कलिंगड लागवड केली आहे. कलिंगडचे चांगले उत्पन्न आले असून स्वतःचे विक्री केंद्र उभारून त्यांनी कलिंगड विक्री सुरू केली आहे. धामणी बडदवाडी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत भात शेती घेतल्यानंतर त्याच ठिकाणी भाजीपाला लागवड तसेच केळी लागवड आणि कलिंगड लागवड घेण्याचा संकल्प बचत गटाचे अध्यक्ष प्रकाश रांजणे यांनी केला. उद्योजक अमोल लोध आणि पेम संस्थेचे सतीश कामत यांनी चांगले मार्गदर्शन केले. बचत गटाच्या माध्यमातून पुरुष गटाने घेतलेली शेती चांगले उत्पन्न देऊ लागली असून शेतकरी स्वयंपूर्ण होऊ लागले आहेत.
यावर्षी केलेल्या कलिंगड लागवडीतून स्वतःचे विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.यावर्षी तापमानात झालेला बदलामुळे मोठा फटका कलिगडाला बसला आहे. श्री गणेश उत्पादक बचत गटाने सुरू केलेल्या कलिंगड विक्रीमध्ये २५ रुपये किलोने कलिंगड विक्री होत आहे. या ठिकाणी विक्री केंद्राची जबाबदारी सुरेश रांजणे यांनी घेतली आहे. तसेच शेतीवर माकडे आणि गवे रेड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे वनविभागाने गांभीर्याने दखल घेतली तर शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळता येईल. व अधिकचे उत्पन्न मिळून इतर शेतकऱ्यांना ही सामूहिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यामध्ये आनंद आहे. मात्र मेहनत आणि होणारा खर्च विचारात घेता तेवढे ते उत्पन्न मिळत नाही. मात्र ही शेती अजूनही आम्ही सुरूच ठेवली असून याचा आदर्श शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे.
-सुरेश रांजणे (विक्री केंद्राचे प्रमुख)