(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या वतीने गणपतीपुळे समुद्रकिनारी अतिक्रमण केलेल्या एका व्यावसायिकावर आज गुरूवारी २९ फेब्रुवारी रोजी धडक कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी या व्यावसायिकावर मागील डिसेंबर 2023 मध्ये कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर संबंधित व्यावसायिकाच्या दुकान स्टॉलचे साहित्य जप्त करण्यात आल्यानंतर पुन्हा त्या व्यावसायिकाने आपले दुकान स्टॉल समुद्र किनारी सुरू ठेवले होते. त्यानंतर गणपतीपुळे येथील ग्रामपंचायतीने गुरूवारी आपली धडक कारवाई करीत संबंधित व्यावसायिकाचे सर्व दुकान स्टॉल बाजूला केले आहेत.
अशाच प्रकारे इतर अतिक्रमण केलेल्या सर्वच व्यावसायिकांवर गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून आता लवकरच थेट धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या धडक कारवाई वेळी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक , ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने ही धडक कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईमुळे आता गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरील इतर व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, गणपतीपुळे ग्रामपंचायतीची मागील प्रजासत्ताक दिनाची अर्थात 26 जानेवारीची ग्रामसभा तहकूब झाली होती त्यानंतर तब्बल दोन ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर अद्यापही गणपतीपुळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा झालेली नाही. मात्र, गणपतीपुळे समुद्रकिनारी अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने ग्रामसभांमध्ये गदारोळ घालत होते. अखेर एका व्यवसायिकाने गणपतीपुळे समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने त्याबाबत कारवाई करून आता ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांना योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. एकूणच ग्रामस्थांच्या मागणीनुसार ही धडक कारवाई केल्याचे मत व्यक्त होत आहे.