(मुंबई)
मुंबईतील सांताक्रुझ पोलीस कॅम्पमधील T5 इमारतीमध्ये राहणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने कॅम्प परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस वसाहतीच्या टेरेसवर त्यांनी आत्महत्या केली आहे. प्रल्हाद बनसोडे (वय वर्ष ४२) असं आत्महत्या करणाऱ्या पोलिसाचे नाव होते. ते सहाय्यक पोलिस निरिक्षक पदावर कार्यरत होते. आत्महत्या करण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही परंतु आंतरजिल्हा बदली होत नसल्याने आत्महत्या केली अशी परिसरात चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांयकाळी साडे सहाच्या सुमारास घरी कोणी नसताना, प्रल्हाद इमारतीच्या टेरेसवर गेले आणि तेथेच त्यांनी गळफास लावून घेतला. थोड्यावेळाने इमारतीतील वॉचमॅन हे टेरेसवर कामानिमित्त गेले होते. त्यावेळीस त्यांना प्रल्हाद हे लटकलेल्या अवस्थेत दिसले. या घटनेची माहिती वॉचमॅनने इतर पोलिसांना दिली. प्रल्हाद यांच्या पत्नी सांयकाळच्या वेळी भाजी आणण्यास बाजारात गेली होती त्यावेळी त्यांनी हे कृत्य केले. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी वाकोला पोलिस ADR दाखल करून घेतली आहे.
प्रल्हाद बनसोडे यांच्या पश्च्यात दोन मुले आणि पत्नी आहेत. मुंबई पोलिसांचा BDDS पथकात कार्यरत होते. त्यांची नेमणूक बॉम्बशोधक व नाशक पथक, कलिना येथे होती. नुकतीच त्यांची बढतीवर बदली झाली होती. प्रल्हाद हे जळगावचे निवासी होते. आपली आंतरजिल्हा बदली व्हावी यासाठी ते प्रयत्न करत होते. पण त्यांची बदली होत नव्हती. या कारणाने ते तणावात आले आणि आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्यामुळे आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नाही. कुटुंबियांचे जबाब नोंदवले असून त्यात ते तणावाखाली असल्याचे सांगण्यात आले आहे. पण त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.