जय जय रघुवीर समर्थ. जाणणे हे सगळ्यांना प्रमाण असले तरी मूर्खांना प्रमाण वाटत नाही. परंतु जाणल्यावरच अलिप्तपणाची खुण पटते. एक जाणणे सोडून कोणी प्राण्याला सोडवू शकत नाही. कोणत्याही कार्यात पारंगत झाल्याशिवाय ते कळत नाही. जाणणे म्हणजे स्मरण, विसरणे म्हणजे विस्मरण. दोन्हीमध्ये काय प्रमाण आहे ते शहाणे जाणतात. जाणते लोक शहाणे, नेणते लोक वेडे दैन्यवाणे . अनुभव म्हणजे काय ते देखील जाणल्यावरच समजतात. जिथे जाणपण खुंटले तिथे बोलणंही संपलं आणि हेतूरहित समाधान झाले. श्रोते म्हणतात हे बरोबर आहे. याच्यामुळे आमचं खूपच समाधान झालं पण आम्हाला पिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण सांगावे. ब्रम्हांडी तेच पिंडी असे असे अनेकदा बोलले जाते परंतु त्याचा प्रत्यय येईल असे केले पाहिजे. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे जाणपण निरूपण नाम समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक नऊ समास 5 अनुमान निरसन नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. ब्रम्हांडरचना ही पिंडासारखी आहे असं बोललं जातं पण ते आम्हाला काही लक्षात येत नाही विविध मते पाहून आमचे मन भांबावते. जे पिंडी तेच ब्रह्मांडी असं बोलायची प्रौढी आहे हे वचन तत्त्वज्ञ लोक नेहमी बोलत असतात. पिंड ब्रम्हांड एक अशी बोलण्याची पद्धत आहे, परंतु अनुभवाच्या निकषावर ते टिकत नाही. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे चार पिंडीचे देह आहेत. विराट हिरण्य व्याकृत मूळप्रकृती ही ब्रह्मांडीची खुण आहे. ही शास्त्राची रचना जाणावी पण त्याची प्रचिती कशी येईल? प्रचिती नसल्यामुळे गोंधळ होतो आहे.
पिंडामध्ये अंत:करण आहे तर ब्रम्हांडामध्ये विष्णू आहे, पिंडामध्ये मन आहे तर ब्रम्हांडामध्ये चंद्र आहे. पिंडामध्ये बुद्धी आहे तर ब्रम्हांडामध्ये नारायण. पिंडामध्ये अहंकार तर ब्रम्हांडामध्ये रुद्र असा विचार शास्त्रामध्ये दिलेला आहे. विष्णू म्हणजे अंतकरण हे कसे? चंद्र म्हणजे मन हे कसे? ब्रह्माचे लक्षण बुद्धी हे कसे? मला सांगावं. नारायणाचं चित्त, रुद्र अहंकाराचा हेतू, हा विचार काय आहे ते मला सांगावे. अनुभवापुढे अनुमान म्हणजे सिंहापुढे आलेले श्वान होय! खऱ्यापुढे खोटे प्रमाण कसे होईल? याच्यासाठी पारखी पाहिजे. पारखून मग निश्चय करायला हवा. परीक्षा नसेल तर अनुमानाविषयी संशय निर्माण होईल.
विष्णू चंद्र आणि ब्रम्हा नारायण आणि रुद्र नामा या पाचाची अंतकरण पंचके आम्हाला स्वामींनी सांगावे. येथे प्रचिती हे प्रमाण आहे शास्त्राचे अनुमान लागत नाही किंवा शास्त्रात पाहिले तरी त्याचा प्रत्यय आला पाहिजे. प्रचितीविणे बोलणे म्हणजे तोंड पसरून रडणाऱ्या कुत्र्याप्रमाणे कंटाळवाणे आहे. प्रचितीच्या नावे शून्य असेल तर काय बोलायचं आणि काय ऐकायचं! सगळे आंधळे जमा झाले, तिथे डोळस माणसाचे काय काम? अनुभवाचे नेत्र गेले की अंधकार उरतो! दूध नाही पाणी नाही विष्ठा ठेवली तर तिथे निवडायला कोण येणार? डोमकावळे! आपल्या इच्छेने बोलले, पिंडासारखे ब्रम्हांडाची कल्पना केली पण ते प्रचितीस कोणत्या प्रकाराने आले? म्हणून हे सगळं अनुमान आहे. कल्पनेचे रान आहे. भल्या माणसाने त्या आडरानात जाऊ नये. तस्कराने जावे.
कल्पनेने मंत्र निर्माण केले, देवही कल्पनामात्र. देवही स्वतंत्र नाहीत ते मंत्राच्या आधीन आहेत. येथे न बोलता जाणावे, बोलताना थोडा काही विचार करावा, चालण्यावरून हा अंध आहे आहे की डोळस हे चतुर माणूस ओळखतो तसं ते ओळखावं. ज्याला जसं भासलं तसं त्यांनी कवित्व केलं, पण आपल्याला प्रचिती आल्यावर ती मग ते निवडायला हवे. असे समर्थ सांगत आहे. पुढील कथा ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
-पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रका / लेखक)
मोबा. 9420695127