जय जय रघुवीर समर्थ. आत्म्याला आत्मपण नाही हेच निःसंगाचे लक्षण आहे. मात्र हे शब्दात सांगितले ते कळण्यासाठी, अन्यथा या बोलण्यातून त्याचा अर्थ समजेल हे कठीण आहे. तत्त्वाचे विवरण केले असता वाक्य अपोआप समजते. तत्वविवरण करून निर्गुण ब्रह्म शोधले, आपल्याला आपण पाहिले तर ते समजते. हे न बोलताच विवरण केले जाते. विवरण केले की विरून जाते. मात्र महापुरुषाच्या सर्वसामान्य सहवासामध्ये अबोल असताना देखील समजते. तिथे शब्द हे निशब्द होतात. वेद नेती नेती म्हणतात. आत्मप्रचिती प्रत्यक्षात येते. प्रत्यक्षात आल्यानंतर त्याचे अनुमान करणे हा दुराभिमान आहे. तरी मी अज्ञानी हे वर्णन का करतो? कळत नाही.
मी खोटा, माझे बोलणे खोटे, मी खोटा माझे चालणे खोटे, मी आणि माझे हे सगळेच खोटे आणि काल्पनिक. मीपणा आला तिथे सगळेच व्यर्थ. माझे बोलणे निरर्थक आहे. हा प्रकृतीचा स्वभाव आहे आणि प्रकृती ही खोटी आहे. प्रकृती आणि पुरुष या दोन्हीचा जिथे निरास होतो तिथे मी उरेल, हे कसे घडेल? जिथे सगळेच नष्ट झालं तिथे विशेष भावना कशी राहील? मी मौनी असे म्हटल्यावर मौन देखील भंग पावते त्याप्रमाणे हे आहे. आता मौन भंगू नये. करूनही काहीही न करावे. असूनही संपूर्णपणे नसावे, असं समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्मनिरूपणनाम समास द्वितीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक नऊ, समास तीन, निसंदेह निरूपणनाम समास
जय जय रघुवीर समर्थ. श्रोत्यांनी अनुमान केले, असे कसे ब्रह्मज्ञान? काहीच नसून असते असं कसं आहे? सगळं करूनही अकर्ता. सगळं बघूनही अभोक्ता. सगळ्यांमध्ये अलिप्तता कशी येईल? पण तुम्ही सांगता, योगी भोगूनही अभोक्ता. स्वर्ग नरक देखील तसेच असतात. ते कसे? जन्ममृत्यू भोगणारा भोगी असतो परंतु भोगून अभोक्ता योगी असतो? याच न्यायाने त्याला यातना होत नाहीत? मारले तरी मार लागत नाही, रडला तरी रडत नाही, कुंथला तरी कुंथत नाही असा योगेश्वर आहे. जन्म नसला तरी जन्माला येतो. असा श्रोत्यांचा प्रश्न आहे याचं उत्तर आता सांगितलं पाहिजे. वक्ता म्हणाला सावध व्हा, तुम्ही चांगले बोलता पण तुमच्या अनुभवानेच तुम्हाला हे समजेल. ज्याचा जसा अनुभव तसं तो बोलतो. संपदा नसेल तर त्याला धैर्य व भरवसा देणे निरर्थक आहे.
ज्ञानाची संपदा नसेल अज्ञानरूपी दारिद्र्याची आपदा असेल तर शब्द ज्ञानामुळे ते भोग भोगावे लागतात. योगेश्वराने योगी ओळखावा, ज्ञानेश्वराने ज्ञानी ओळखावा आणि महाचतुराने चतुर ओळखावा. अनुभवी माणसाला अनुभव समजतो, अलिप्त माणसाला अलिप्तपणा समजतो आणि विदेहाचे देहभान विदेही पाहताच गळते. बद्ध माणसासारखा सिद्ध आणि सिद्धासारखा सिद्ध एक शहाणा एक मूर्ख, म्हणूच नये. झपाटलं गेलेला तो देहधारी, आणि पंचाक्षरी देखील देहधारक.पण त्या दोघांना एकसारखे कसे मानावे? त्याप्रमाणे अज्ञानी पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त दोघे समान आहेत असं म्हणणं शहाणपणाचे कसे म्हणायचे? आता हा दृष्टांत काही प्रचितीला येत नाही. श्रोत्यांनी क्षणभर सावधानपणे ऐकावे. ज्ञानामुळे जो जो गुप्त झाला जो विवेकामुळे विरून गेला तो अनन्यपणे उरलेलाच नाही त्याला कसे शोधायचे? शोधायला गेले की तोच होऊन जातो! तोच झाल्यानंतर काहीही बोलावे लागत नाही. देहामध्ये पाहिले तर दिसत नाही तत्वे शोधली तर भासत नाही, ब्रह्म आहे असा काही केल्या निश्चय होत नाही. दिसतो देहधारी, पण आत मध्ये काहीच नाही, त्याला वर वर पाहिल्यावर तो कसा कळेल? असा प्रश्न समर्थ विचारत आहेत. त्याचे उत्तर ऐकूया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127