रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गावातील गुम्बद मोहल्ला येथे गंजलेल्या स्थितीत एक विद्युत खांब आहे. हा खांब केव्हाही कोसळून मोठा अपघात होवू शकतो. भर वस्तीत असलेला हा खांब नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारा आहे.
एवढेच नव्हे तर गावामध्ये अनेक विद्युत खांब गंजलेल्या स्थितीत आहे. याकडेही महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. एखाद्या वीज खांब कोसळून जीव जाण्याची वाट महावितरण पाहतेेय का ? असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून होत आहे. हा खांब कोसळू नये म्हणून नागरिकांनी एका वायरने बांधून ठेवला आहे. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी याकडे लक्ष देतील का ? की जीव गेल्यानंतर लोकांचे रौद्ररुप पाहण्याची ते वाट पाहताहेत. वेळीच हा खांब बदलून होणारा पुढील अनर्थ टाळावा अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.
22 फेब्रुवारी 2022 ला गुहागर येथे भरत उतेकर (35, गुहागर) हे विद्युत पोलावर वायरींगचे काम करत असताना पोलासहीत कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेवरुन तरी महावितरण बोध घेणार का ? असा सवालही स्थानिक नागरिक करत आहेत.