(वैभव पवार / गणपतीपुळे)
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध जेष्ठ अभिनेते तथा दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा भाग – 2’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शुभारंभ शुक्रवारी दुपारी गणपतीपुळे येथे श्रींच्या दर्शनाने करण्यात आला.
गणपतीपुळे येथे चित्रीकरण केलेला ‘नवरा माझा नवसाचा’ हा पहिला चित्रपट महाराष्ट्रभर गाजला होता. गणपतीपुळेच्या गणपतीने नवस कसा फेडून घेतला याचे चित्रीकरण पहिल्या चित्रपटात झाले. या चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी स्थानिक तरूणांनाही छोट्या भूमिकेत घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर हा चित्रपट गाजल्यानंतर आता सचिन पिळगावकर यांनी पुन्हा तोच दुसरा भाग प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला आहे. या कारणास्तव ‘नवरा माझा नवसाचा भाग – 2’ या चित्रपटाचे गणपतीपुळे येथे शुभारंभ करण्यासाठी सचिन पिळगावकर गणपतीपुळे येथे शुक्रवारी आले होते.
यावेळी त्यांनी श्रीं चे मनोभावे दर्शन घेऊन शुभारंभ केला. त्यावेळी मुख्य पुजारी प्रभाकर मोरेश्वर घनवटकर यांनी त्यांची मनोकामना बाप्पा पर्यंत पोहोचवली. त्यानंतर त्यांनी आगामी काळात गणपतीपुळे मंदिर आणि परिसरा मध्ये होणाऱ्या चित्रिकरणाबाबत संस्थान श्री देव गणपतीपुळेचे अध्यक्ष विनायक राऊत आणि सर्व पंचकमिटी यांचेशी नियोजन बाबत चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली.तसेच लवकरच आगामी काळात या ठिकाणी सर्व चित्रीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती सचिन पिळगावकर यांनी शुक्रवारी गणपतीपुळे येथे दिली आहे. त्यामुळे पिळगावकर यांच्या दुसऱ्या चित्रपटाची उत्सुकता आता लागून राहिली आहे.