(संगमेश्वर / विवेक शेट्ये)
पूर्वी निरीक्षर असलेल्या माणसाला अंगुठी छाप असे संबोधायचे. अंगुठे छाप हा शब्द जरी कानावर पडला तरी समोरील व्यक्ती निरक्षर आहे हे कळायचे आणि त्याला कारणही तसेच होते. सरकारी कागदावर किंवा कुठल्याही शासकीय कामात स्वाक्षरी मारायचे काम असल्यास जर समोरील माणूस निरक्षर असेल तर तो अंगठा मारून आपले कार्य पूर्ण करीत असे. आपल्याकडे सर्वसाधारणपणे साक्षर लोक सही करतात आणि निरक्षर किंवा अक्षर ओळख नसलेली लोक अंगठा लावतात. त्यांना अंगठाछाप, अंगठेबहाद्दर म्हणतात. परंतु, सहीऐवजी अंगठ्याचे ठसे घेणे, किंवा पुरावा-ओळख पटवण्यासाठी अंगठ्याचे ठसे घेणे ही पद्धत कधी सुरु झाली.
बोटांच्या तळहाताकडील भागाला शाई किंवा चिकट पदार्थ लावल्यास आणि ते बोट कागद , कापड आदींवर लावल्यास बोटांवरील रेषा-आकार जशाच्या तशा उमटतात, याला बोटांचे ठसे म्हणतात. या ठशांचा अभ्यास करणारेही शास्त्र असते त्याला ‘अंगुलीमुद्राशास्त्र’ अथवा बोटांच्या ठशांचे शास्त्र म्हणतात. या रेषांचे वैशिष्ट्य असे की, त्या आयुष्यभर त्या कायम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या हातावरील रेषा समान नसतात. त्यामुळे व्यक्तीची स्वतंत्र ओळख होण्यासाठी अंगठा किंवा बोटांचे ठसे महत्त्वाचे असतात.
एखादया व्यक्तीची ओळख त्याच्या शारीरिक लक्षणांवरून किंवा वर्तनानुसार करण्याच्या पद्धतीला जीवओळख म्हणतात. या पद्धतीचा वापर मुख्यत्वे एखाद्या व्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी केला जातो. १८५८ साली स्कॉटलंड पोलिसांनी सर्वप्रथम या तंत्राचा वापर केला. सध्या ओळखपत्र, वाहनचालक परवाना, मतदारपत्र, पारपत्र तयार करण्यासाठी हे तंत्र वापरतात. संगणकीय तंत्रामुळे जीवओळख पद्धती अतिशय विकसित झाली आहे आणि तिचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.
परिस्थिती भिन्न आहे नवीन पिढी शिक्षित होण्याचा जरी काळ बदलला असला तरी वेळ मात्र तशीच आहे आधुनिकीकरण आणि तांत्रिक युगात आजही अंगठ्याचा दररोज दैनंदिन व्यवहारात वापर होतो. त्यामुळे त्याचे महत्त्व वाढले आहे. मराठीतील अंगठ्यापेक्षा इंग्रजीतील ‘थम्ब’ला मान अधिक असल्याने नवीन पिढीला आपण अंगुठी छाप म्हणू शकत नाही हे विशेष.
आज घडीस भारतात प्रत्येक जण शिकून साक्षर बनावे याकडे प्रशासनाचा कल आहे. आणि परिस्थिती सुद्धा तशीच आहे, सर्व साधारणपणे आज हल्लीच्या युगात गरिबातील गरीब व्यक्ती सुद्धा किमान दहावी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत आहे. बँकेतून पैसे काढण्यापासून तर शासकीय कार्यालयात हजर असल्याचे प्रमाण देण्यासाठी अंगठ्याचा सर्रासपणे वापर करावा लागत आहे, हे आपल्या नजरेसमोरून चुकत नाही. आपल्याला स्पष्टपणे सर्वत्र दिसूनच येत आहे. इतकेच नाही तर आजच्या तांत्रिक युगात वापरल्या जाणाऱ्या मोबाईल ला सुद्धा अंगठ्यानेच लॉक आणि ओपन करण्याचे कौशल्य अस्तित्वात आले आहे. जो अंगठा ठेंगा देखवण्यासाठी प्रसिद्ध होता तोच अंगठा एखाद्या कार्य सफल झाले असे इशाऱ्यात सांगायचे झाल्यास आज घडीस अंगठ्याला वर करून दाखवला जात आहे