(निवोशी/गुहागर- उदय दणदणे)
गुहागर तालुक्यातील निवोशी गावचे श्रद्धास्थान आई श्री जाखमाता देवीचे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणातील महत्त्वाचा सण शिमगोत्सव आणि याच शिमगोत्सवात ग्रामदेवतेच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रथा, रूढी, परंपरा कायम जोपासत निवोशी -भेलेवाडीचे ग्रामस्थ व मुंबईकर चाकरमानी शिमगोत्सवात गाव भोवनीसाठी फाल्गुन पंचमीच्या दुसऱ्या दिवशी गावच्या सीमेबाहेर पडत असतात. ग्रामदेवतेच्या मंदिरात पारंपरिक साज परिधान करून निवोशी गावचे श्रद्धास्थान श्री जाखमाता देवीच्या चरणी नतमस्तक होऊन. डफावर थाप मारून देवीचे प्रतिरूप म्हणून गोमू व नटवा तसेच देवखेळी आणि अखंड विश्वाचं भार संबाळणारी धरती मातेची आरती करून, निवोशी भेलेवाडीचे ग्रामस्थ देवखेळी अगदी श्रद्धेने गावभोवनीसाठी अनवाणी पायाने बाहेर पडत असतात.
चतुरसीमा पार करत निवोशीचे ग्रामदैवत आई श्री जाखमातादेवीच्या दोन बहिणींची गावे प्रामुख्याने पहिली घेतली जातात. त्यात वरवेली गावचे ग्रामदैवत श्री हसलाई देवी आणि पालशेत गावचे ग्रामदैवत- श्री झोलाई देवी या ठिकाणी पहिली भेट घेऊन झाल्यावर क्रमाने वरवेली, असगोली, गुहागर, वेळंब, पोमेंडी, गोणवली, पालशेत, या गावांत भोवनीचे खेळे जात असतात. ज्या ज्या गावात माहेरवाशीण असते तिथे श्रद्धेने, आदराने सर्व देवखेळयांची राहण्याची जेवणाची व्यवस्था होत असते. अनेकांच्या हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई श्री जाखमातादेवीच्या देवखेळयांना व प्रतिरूप गोमू व नटव्याला विशेष महत्व प्राप्त आहे. गुहागर तालुक्यात निवोशी भेलेवाडीतील नटवा हे शिमगोत्सवात विशेषतः आकर्षक असते.
सहकारी मित्र मंडळ निवोशी (भेलेवाडी) मंडळाने आजवर अनेक रूढी परंपरा जोपासत कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात मंडळाची कामगिरी अग्रस्थानी असून भोवनीच्या खेळयातून प्राप्त होणाऱ्या फंडातून ग्रामदेवतेचे सण, उत्सव, व सामाजिक कार्यासाठी निधी वापरला जातो.
पालशेत येथील खारवी समाज व भंडारी समाज यांची श्री जाखमाता देवी व देवीच्या खेळयांवरती अपार श्रद्धा आहे. शेवटच्या दिवशी पालशेत मधील सर्व समाज बांधव-भगिनी एकत्र येतात. श्री जाखमाता देवीचे प्रतिरूप गोमू व नटव्याची पूजा अर्चा करून नवस व नवसाची परतपेड करत. देवखेळयांना अगदी श्रद्धेने ,आदराने गावच्या सीमेपर्यंत पाठवणीकरीता मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. नवव्या दिवशी रात्री निवोशी भेलेवाडीचे देवखेळी गावाच्या सीमेवर येऊन रात्री.१२ वाजता गावात प्रवेश करतात आणि याच दिवसापासून निवोशी गावात होळी सणाला खरी सुरुवात होते.