(मुंबई)
राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल (बुधवार) दुपारी मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मात्र, आज पहाटे त्यांचे निधन झाले. वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
मनोहर जोशी यांना काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक होते. त्यांना जोशी सर असेही संबोधले जाते. शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येत त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली . १९७६ ते १९७७ या काळात ते मुंबईचे महापौरही झाले. तर शिवसेना भाजपाच्या युतीचे सरकार जेव्हा १९९५ मध्ये आले तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्रीही झाले.
गेल्या काही काळापासून राजकारणात मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते. मनोहर जोशींनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यपदही भूषविले होते.
मनोहर जोशी हे मूळचे बीडचे. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षणाच्या निमित्तानं मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली, त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं.
शिवसेनेत बंड झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात, त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या ज्येष्ठ नेत्यांची भेट एकनाथ शिंदे यांनी घ्यायला सुरूवात केली. आम्ही जुन्या जाणत्या नेत्यांना विसरलेलो नाही. त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांची विचारपूस करत आहे, हे दाखवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांचीही भेट घेतली होती.