(रत्नागिरी)
जिल्ह्यातील 36 रास्त धान्य दुकानदारांचे तात्पुरते असलेले परवाने कायमस्वरूपी केले जातील असे आश्वासन अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम, रमेश राणे यांनी भुजबळ यांची भेट घेतली होती.
याबाबत पत्रकारांना माहिती देताना जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले की, जिल्ह्यात शेकडो रास्त धान्य दुकाने असून त्यातील 36 दुकानदारांना 2001 ते 2017 या काळात तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तात्पुरत्या स्वरुपात रास्तभाव धान्य दुकानांचे व्यवस्थापन मंजूर करण्यात आले होते. या तात्पुरते आदेशाच्या आधारेच आजतागायत संबंधितांकडे वितरण व्यवस्थापन आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून संबधित ही दुकाने चालवीत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन ही दुकान आहेत. या दुकानदारांनी कोरोना काळात शिधापत्रिकाधारकांना चांगल्याप्रकारे सेवा दिली आहे. आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणत्याही तक्रारी नाहीत. असे असताना तात्पुरते व्यवस्थापन असलेल्या रास्तभाव धान्य दुकानदारांकडे कोणत्याही प्रकारचे प्राधिकार पत्र नाही.
हे पत्र मिळाल्यास शासन नियमानुसार देय होणारी अनामत रक्कम, प्राधिकार पत्र शुल्क, नुतनीकरण शुल्क आदी नियमानुसार भरण्यास ते तयार असून त्यांचेकडे सदरचे व्यवस्थापन चालविण्यास पुरेशी जागाही उपलब्ध आहे. याचा विचार करून गेल्या तीन वर्षापासून आम्ही अन्न, नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्याकडे या दुकानदारांना कायमस्वरूपी परवाना मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्याला आता यश आले आहे. तसे आदेश लवकरच ते देणार असल्याचे त्यांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी झालेल्या भेटीत सांगितले, असे कदम यांनी स्पष्ट केले.