(रत्नागिरी)
तालुक्यातील नाणिज गावातील खासगी विहिरीतून मिऱ्या नागपूर हायवेच्या बांधकामासाठी पाणी पुरवले जाऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने तहसीलदार, प्रांत आणि पोलिसांना दमछाक करण्यास भाग पाडले. अखेर नाणीजमधील खासगी विहिरीचे पाणी मिळणे बंद झाल्यानंतर महामार्गच्या ठेकेदाराने शेजारच्या गावातून पाणी घेण्यास सुरुवात केली. या घडामोडींमधून संघर्ष निर्माण झाल्याने विहीर मालकाने जिल्हाधिकारी व ग्रामपंचायतीसह अनेकांना दावापूर्व कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
नाणीज गावातील सरफरे वाडीत राहणाऱ्या वासुदेव तारी यांच्या खासगी विहिरीतून मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या बांधकामाला पाणी पुरवले जात होते. महामार्गाचे काम करणाऱ्या रवी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून व्यावसायिक तत्त्वावर पाणी दिले जात होते. त्यामुळे विहीर मालकाला ग्रामपंचायतीमध्ये बोलावून पाणी देणे बंद करा, गावात पाण्याची टंचाई होईल, असे सांगून दबाव टाकण्यास सुरुवात झाली.
विहीर मालक दबावाला बळी पडत नसल्याचे पाहून तहसीलदार, प्रांत यांनाही गावात येण्यास भाग पाडण्यात आले. पोलिसांनासुद्धा याप्रकरणी घटनास्थळी येऊन प्रकरण क्षमवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर गावातील महिलांना जमावून मोर्चाची आखणीसुद्धा करण्यात आली. महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने पाणी घेवू नये यासाठीही दबाव आणण्यात आला. महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने नाणिज गावातील विहिरीचे पाणी घेणे बंद केले. अखेर मेटाकुटीस आलेल्या विहिर मालक तारी यांनी ग्रामपंचायतीसह अनेकांना दावापूर्व कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह सरपंच, पोलिस पाटील, एका सदस्यासह ज्यांचा या प्रकरणात सहभाग होता, त्यांना ही नोटीस पाठवली आहे