[ रत्नागिरी / प्रतिनिधी ]
शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी आयोजित माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता बुध्दी प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात दिलेल्या जेवणातून शिक्षकांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वीस ते बावीस शिक्षक उलट्या, जुलाब , तापाने हैराण झाले असून काही शिक्षक दवाखान्यात दाखल होऊन उपचार घेत आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण १५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. या निवासी प्रशिक्षासाठी जिल्ह्यातील अनेक शिक्षक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, सध्या दहावीच्या विद्यार्थीच्या तोंडी व प्रॅक्टिकल परीक्षेचा काळ सुरू आहे. या परीक्षेच्या कालावधीत शिक्षकांची शाळेत गरज असतानाही शिक्षकांना प्रशिक्षण घेण्यासाठी बोलावणे यातून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
या प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना तिथेच राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र शिक्षकांना मिळालेल्या जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून जवळपास वीस ते बावीस शिक्षकांना ताप, उलट्या जुलाब होणे सुरू झाले. शिक्षकांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर काहींना उपचार करण्यात आल्यावर घरी जाऊ देण्यात आले, मात्र थोड्यावेळाने पुन्हा त्रास झाल्याने उपचारासाठी पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या धक्कादायक घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण? असा ही सवाल उपस्थित होत असून सर्व प्रकरणाची चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
अत्यवस्थ शिक्षकांना आवश्यक ती मदत तात्काळ देण्यात यावी….
या त्रासाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुशील शिवलकर यांच्याशी संपर्क साधला असता प्रशिक्षणादरम्यान घडलेला हा प्रकार म्हणजे शिक्षकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. तसेच बोर्ड परीक्षेच्या तोंडावर अशी निवासी प्रशिक्षणे घेणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. निवासी प्रशिक्षणे बंद करण्यात यावीत. तसेच या प्रशिक्षणाच्या व्यवस्थेसाठी मिळणारा सर्व निधी संबंधित प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. त्याचबरोबर घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी व सध्या अत्यावस्थ असणाऱ्या सर्व शिक्षकांशी “डाएट”ने संपर्क करून त्यांना आवश्यक ती मदत तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने अध्यक्ष सागर पाटील यांनी प्राचार्य डॉ. सुशील शिवलकर यांच्याकडे केली आहे.