(मुंबई)
राज्यात विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये एसटीचे स्वच्छता अभियान प्रगतीपथावर असून पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्हे चांगली कामगिरी करुन स्पर्धेत अव्वल स्थानावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील १३ बसस्थानकापैकी ८ बसस्थानके सर्वेक्षणात ५० पेक्षा कमी गुण मिळवून नापास झाले आहेत.
खोपट बसस्थानकाला मुख्यमंत्र्यांनी खडे बोलून सुनावले होते, ते बसस्थानक १०० पैकी ५९ गुण मिळवून मध्यम दर्जा मिळवून कसेबसे पास झाले आहे. मुंबईतील ६ बसस्थानकांनी प्रगती साधली असून, परळ बस स्थानकाने ६५ गुण मिळवून मुंबईमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ मे रोजी एसटी स्थानकांबाबतच्या मोहिमेची घोषणा केली. दर दोन महिन्यांनी स्थानकांचे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल जाहीर करण्यात येणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील ५६३ एसटी स्थानकांतील तिसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ महिन्याचा तिसरा सर्वेक्षण अहवाल पूर्ण झाला आहे. त्यामध्ये राज्यातील एसटीचे डेपो, बसस्थानकांना स्वच्छतेनुसार गुण देण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यांतर्गत राज्यातील १९१ बस स्थानके ही ५० पेक्षा कमी गुण मिळवून असमाधानकारक स्वच्छतेमध्ये समाविष्ट झाली असून ३१७ बस स्थानके ही ५० ते ७० आणि ५५ बसस्थानके ७० पेक्षा जास्त गुण मिळवून स्वच्छता राखण्यामध्ये यशस्वी झाली आहेत.
राज्यातील ३१ विभागापैकी मराठवाड्यातील जालना, विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती व पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागात सर्वच्या सर्व बसस्थानके ही चांगले गुण प्राप्त करून स्वच्छतेच्या मार्गावर प्रगतीपथावर आहेत.
कोकण विभागातील ८७ पैकी ४२ बसस्थानके असमाधानकारक स्वच्छता गटात समाविष्ट असून मराठवाड्यातील ११७ पैकी ५१ बसस्थानके असमाधानकारक स्वच्छतेमध्ये गणली गेली आहेत.