(देवरूख / सुरेश सप्रे)
आज सकाळी 07.30 वाजण्याच्या सुमारास मौजे-मेढे तर्फे फुणगुस, ता. संगमेश्वर, येथील सुभाष दत्ताराम देसाई, यांच्या राहते घराचे समोर विहिरीमध्ये बिबट्या पडल्या असल्याची खबर पोलिस पाटील दीपक सावंत यांनी वनपाल संगमेश्वर(देवरुख) यांना दिली. त्यानंतर त्यांनी रेस्क्यू टीमसह घटनास्थळी येऊन पाहणी केली.
विहीर सुमारे 25 फुट खोल व 10 फुट रुंद तसेच कठडा 3 फुटाचा असून सदरची विहीर पूर्णपणे दगडी बांधकाम केलेली आहे. विहीरीमध्ये दोन ते अडीच फुट पाणी असून त्यामध्ये बिबट्या खाली दगडाचा आधार घेऊन बसलेला दिसला. त्यांनतर ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीमध्ये सोडल्यांनतर 2 ते 3 मिनिटांमध्ये बिबट्याला पिजऱ्यामध्ये जेरबंद केले. ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहीरी बाहेर घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी, देवरुख आनंदराव कदम यांनी जेरबंद बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली, सदर बिबट्या हा अंदाचे 3 वर्षाचा असुन तो नर जातीचा आहे. तपासणी वेळी बिबट्याच्या अंगावर ताजी अगर जुनी जखम दिसुन आली नाही. सुस्थितीत असल्याने जेरबंद बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यास योग्य असल्याचा अवहाल दिला
तौफीक मुल्ला यांनी सदर बिबट्या भक्षाचा पाठलाग करत असताना विहीरीत पडला असल्याची शक्यता असल्याचे सांगितले. त्यानंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले व रेस्कु ऑपरेशन सुरक्षित पार पाडले असून, सदर कामगिरी साठी तौफिक मुल्ला वनपाल संगमेश्वर(देवरुख) वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडूकर, अरुण माळी, व रेस्कु टीम देवरुख चे दिलीप गुरव, निलेश मोहिरे, मिथील वाचासिद्ध,पोलिस पाटिल दिपक सावंत, सरपंच जयंत देसाई व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते .
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा 7757975786 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने तौफीक मुल्ला वनपाल देवरुख (संगमेश्वर) यांनी केले आहे.