(नवी दिल्ली)
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे. निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (5), महाराष्ट्र (6), तेलंगणा (3), उत्तर प्रदेश (10), उत्तराखंड (1), पश्चिम बंगाल (5) ओडिशा (3) आणि राजस्थान (3) या 16 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
अशात आता भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. भाजप पक्षात नुकतेच प्रवेश केलेलं अशोक चव्हाण तर पुण्यातील मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. तर केंद्री मंत्री नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक होत आहे. या सहा जागा लढवण्याची महायुतीनं तयारी सुरु केली होती. अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे याला आणखी बळ मिळाले होते. मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास अडीच तास चर्चा झाली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एक एक जागा मिळणार होती. तर भाजपनं चौथ्या जागेसाठी तयारी सुरु केली होती. पण चर्चेनंतर सध्या मतांची जुळवाजुळव करणं कठीण असल्याचं दिसल्यामुळे भाजपनं चौथा उमेदवार देण्याचं टाळलं आहे. भाजपकडून चौथा उमेदवार न दिल्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.