(गुहागर)
तालुक्यातील उमराठ खुर्द गावचे सुपुत्र आणि आंबेकरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते विनायक रामचंद्र रांगले यांचे गुरूवार दि. ८.२.२०२४ रोजी अल्पशा आजाराने हिंदुजा हाॅस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान रात्री १०.४० च्या दरम्याने वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले.
विनायक रांगले हे उमराठ खुर्द आंबेकरवाडीच्या विकासकामांत तसेच सर्व कार्यक्रमांत सदैव सक्रिय सहभागी असायचे. त्यांनी कमिटी सदस्य पदापासून सचिव पदापर्यंतचा प्रवास केला. वाडीच्या सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापुजेसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीची जबाबदारी बरोबरच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुद्धा इतर सहकाऱ्यांसोबत यशस्वीरीत्या करत असत. अतिशय शांत, सरळ, सुस्वभावी, प्रेमळ, हरहुन्नरी, परोपकाराची व समाज कार्याची सतत तळमळ असणाऱ्या, वैचारीक पार्श्वभूमी लाभलेल्या एका देवमाणसाला काळाने अवेळी तारुण्यात हिरावून नेला. ते एक सच्चे श्री गणरायाचे भक्त होते. हेदवीच्या श्री दशभुज लक्ष्मी-गणेश माघी उत्सवाला ते आर्वजून उपस्थित राहत असत.
विनायक यांचे शालेय शिक्षण गावातील शाळेत, माध्यमिक शिक्षण १० वी एस.एस.सी. पर्यंत हेदवी हायस्कूल तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण विलेपार्ले येथील साठे काॅलेज मध्ये झालेले होते. ते कला शाखेचे पदवीधर होते. वडिलांचे आजारपण व घरची परिस्थिती गरिबीची आणि बेताचीच असल्यामुळे शिक्षणाची आवड, चिकाटी आणि जिज्ञासा असल्यामुळे १२ वी नंतर ग्रॅज्युएशन करताना ३ वर्षे आणि त्या नंतरची ७ वर्षे त्यांनी एका कापड बाजारात नोकरी केली. त्यांनी पुर्ण कापड बाजाराबद्दल माहिती आत्मसात केलेली होती. त्या नंतर Black label, Abacus, R-pac आणि Trinity Technographis अशा आणखी खाजगी कंपनीत १६ वर्षे काम करत असतानाच त्यांचेवर आकस्मिक काळाने घाला घातला. सर्व ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून मालक तसेच सहकारी कामगार वर्गाशी सलोख्याचे संबंध असल्यामुळे अंत्ययात्रेत त्यांचे मालक आणि कंपनीतील कामगार मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते.
कै. विनायक रामचंद्र रांगले यांच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलगा तसेच भाऊ श्रीकांत यांचे कुटुंब असा परिवार आहे. उमराठ खुर्द आंबेकरवाडी विकास मंडळातर्फे तसेच ग्रामपंचायत उमराठ परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.