(मुंबई)
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगामार्फत ९५ टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती आहे. आयोगाने केलेल्या मराठा सर्वेक्षणाची अंतिम आकडेवारी आता समोर आली आहे. गोखले इनस्टिट्यूटने केलेल्या या सर्वेक्षणात तब्बल १ हजार जीबीचा डेटा संकलित झाला आहे.
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने युद्धपातळीवर मराठा समाजाचे मागासलेपण ठरविण्याचे निर्देश राज्य मागासवर्ग आयोगाला दिले होते. त्यानंतर मागासवर्गीय आयोगाकडून केवळ मराठाच नाही तर सर्व जातींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे सर्वेक्षण झाले असल्याने त्यातून समाजाची सध्याची आर्थिक तसेच शैक्षणिक परिस्थिती नेमकी कशी आहे हे समजण्यास मोठी मदत होईल असे राज्य महामार्ग आयोगामार्फत सांगण्यात आले आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाने केेलेल्या या सर्वेक्षणात एकूण २ कोटी ४८ लाख २४ हजार १५१ कुटुंबांचे सर्वेक्षण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. गोखले इनस्टिट्यूटच्या अंतर्गत हे सर्वेक्षण घेण्यात आले आहे. आयोगामार्फत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून मराठा समाजाची एकूण लोकसंख्याही अप्रत्यक्ष मोजली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळले होते. त्यावेळी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे आदेश राज्य मागासवर्ग आयोगाला दिले होते. आयोगाने अहवाल तयार करुन न्यायालयात सादर करावा, असे आदेशात म्हटले होते. यामुळे या सर्वेक्षणाला महत्व प्राप्त झाले आहे. त्यानुसार मराठा सामाजाचे मागासलेपण ठरणार आहे.