(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. त्याबाबत महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. अजित पवार यांना आता अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे.