आपल्या वॉर्ड मधील लोकांना खुष करण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली गेली खरी . मात्र राजकीय लोकांच्या दबावाला बळी पडल्याने अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली.
काल सेनेच्या शहर प्रमुखांसह काही पदाधिकाऱ्यांनी एकाच वॉर्डमधील लोकांसाठी लसीकरण करून घेतलं होतं. याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी घेतली आहे. त्यांनी रत्नागिरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गावडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे .
या नोटीसीमध्ये म्हटले आहे की प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी नसताना तुम्ही तोंडी व लेखी आदेश नसतानाही या लसीकरण केंद्राला परवानगी कशी दिली. तसेच कोरोनाच्या नियमाच्या बाहेर जाऊन असे लसीकरण कसे केले गेले.
तसेच शासनाने लसीकरण केंद्र ठरवलेली असताना तुम्ही नवीन केंद्रावर लस का न्यायला परवानगी दिली. याबाबत सविस्तर आपले म्हणणे देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कारण कोविड-19 या राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत कायदा लागू झालेला असून केंद्र सरकारकडून नियमावली राज्य सरकारकडे येते आणि राज्य सरकारकडून ती जिल्हा प्रशासनाकडे पाठवली जाते. आणि जिल्हा प्रशासन त्याप्रमाणे नियमांची अंमलबजावणी करत असते, असे असताना अधिकाराचा गैरवापर करून येथे लसीकरण केले गेले.
यामुळे ज्यांनी लसीकरणासाठी पूर्वी नाव नोंदणी केली होती त्यांना केंद्रावर लस न मिळाल्याने त्यांना परत जावे लागले होते.
लसीकरणाची परवानगी फक्त जिल्हाधिकारी देत असतात असे असताना हा प्रकार घडल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गावडे यांना जबाबदार धरून त्यांना याबाबतची कारणे दाखवा नोटिस जिल्हा परिषदेने जारी केली आहे.