(नवी दिल्ली)
तबला नवाझ उस्ताद झाकिर हुसेन आणि गायक शंकर महादेवन यांचा सहभाग असलेल्या शक्ती या वाद्यवृंदाला यंदाच्या ग्रॅमी ऍवॉर्डने गौरवण्यात आले आहे. या वाद्यवृंदाच्या धीस मोमेन्ट या अल्बमला यंदाचा सर्वोत्कृष्ट जागतिक अल्बम म्हणून निवडण्यात आले आहे. लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये पुरस्कारांचे वितरण झाले. ग्रॅमी पुरस्कारांचे वितरण करणार् या द रेकॉर्डिंग अकॅडमीने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली आहे.
धीस मोमेन्ट हा शक्ती या बॅन्डचा गेल्या ४५ वर्षातला पहिलाच स्टुडिओ अल्बम आहे. धीस मोमेन्ट या अल्बममध्ये शक्ती वाद्यवृंदाचे संस्थापक जॉन मॅक्लॉक्लीन, गणेश राजगोपालन आणि सेल्वागणेश विनायक्रम यांनी सहबाग घेतला होता. गेल्या वर्षी जूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अल्बमला समिक्षकांनीही गौरवले होते. सर्वोत्कृष्ट अल्बमच्या श्रेणीमध्ये एपिफॅनास, हिस्ट्री, आय टोल्ड देम आणि टाइमलेस या अल्बमना नामांकन मिळाले होते.
जागतिक किर्तीचे दिग्गज तबला वादक उस्ताद झाकिर हुसेन यांना याच समारंभामध्ये आणखीन २ ग्रॅमी पुरस्कारांनी गौरवण्यात आले. ऍज वुई स्पीक या फ्युजन अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट समकालीन वादनासाठीचा पुरस्कार त्यांना मिळाला. या अल्बममध्ये त्यांच्या समवेत बेला फ्लेक, एज मेयर या अमेरिकेतील कलाकारांबरोबर राकेश चौरसिया हे भारतीय बासरी वादकही सहभागी होते. राकेश चौरसिया हे विख्यात बासरी वादक पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे आहेत. याच अल्बममधील पश्तो या फ्युजन गीतासाठी सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत वादनासाठीचा पुरस्कारही झाकिर हुसैन यांना मिळाला.
स्रवोत्कृष्ट संगीत वादनाच्या श्रेणीमध्ये अन्य ८ कलाकारांना नामांकन मिळाले होते. त्यात अबान्डन्स इन मिलेट या फालू गटाच्या गीतालाही नामांकन मिळाले होते. हे गीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारांवर भारतीयांची छाप होती.
या संगीतकारांनाही मिळाला ग्रॅमी पुरस्कार
दरम्यान, गायक टेलर स्विफ्ट, ऑलिव्हिया रॉड्रिगो, मायली सायरस आणि लाना डेल रे यांनाही अनेक ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. जगातील सर्वात मोठ्या संगीत कार्यक्रमात बिली इलिश, दुआ लिपा, बिली चाइल्ड, कोको जोनास, ऑलिव्हिया रॉड्रिगो आणि अनेक लोकप्रिय स्टार्सना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत’ श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल उस्ताद झाकीर हुसेन, राकेश चौरसिया, शंकर महादेवन, सेल्वागणेश व्ही आणि गणेश राजगोपालन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या शक्ती या फ्युजन म्युझिक ग्रुपने धिस मोमेंटसाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला आहे. त्यांची अनोखी प्रतिभा आणि संगीत क्षेत्रातील समर्पणाने जगभरातील मने जिंकली आहेत आणि याचा भारताला अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.