(चिपळूण)
नीला विवेक नातू यांनी ‘आनंदीबाई रघुनाथराव’ या अतिशय अवघड विषयावर लेखन केलं आहे. आनंदीबाई हे गूढ व्यक्तीमत्व होतं. पेशव्यांबाबत खूप वेगवेगळं लिहिलेलं आहे. रघुनाथराव हे तापट स्वभावाचे असले तरी अटकेपार जाऊन आलेले ते एकमेव कर्तबगार योद्धा होते. त्यांच्यासोबत संसार करणे आनंदीबाई यांच्यासाठी निश्चित सोपे नव्हते. आनंदीबाई यांना लिहिता वाचता येत होतं, मोडी लिपी येत होती. नारायणरावांच्या प्रकरणासंदर्भात आनंदीबाई यांच्याविषयी आजही समाजमाध्यमांवर दुर्दैवी लेखन केलेलं दिसतं. या पार्श्वभूमीवर ‘आनंदीबाई रघुनाथराव’ कादंबरीमुळे मळण कन्येला शांतपणे श्वास घेता येईल अशी खात्री वाटत असल्याचे मत पुष्करसिंह पेशवे यांनी व्यक्त केले.
येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आयोजित इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात संपन्न झालेल्या लेखिका सौ. नीला विवेक नातू यांच्या ऐतिहासिक कादंबरी ‘आनंदीबाई रघुनाथराव’च्या प्रकाशन कार्यक्रमात पुष्करसिंह पेशवे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या प्रा. सौ. आदितीदेवी पेशवे-अत्रे, इतिहासतज्ज्ञ महेश तेंडुलकर, ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहासाचे व्यासंगी प्रकाश देशपांडे, दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे, लेखिका सौ. नीला विवेक नातू, लोटिस्मा वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे, लेखिका सौ. संध्या साठे-जोशी उपस्थित होत्या. पेशवे पुढे म्हणाले. ‘आनंदीबाई रघुनाथराव’ ही इतिहासात आनंदीबाई यांच्यावरील ‘ध’ चा ‘मा’ केल्यासंदर्भातील भयंकर आरोप पुसायला सुरुवात करणारी कादंबरी आहे. या कादंबरीद्वारे आनंदीबाई यांचा खरा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. या कादंबरीमुळे आम्हाला कोकणातील मळण, शृंगारतळी कळल्याचे पेशवे यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे इतिहासतज्ज्ञ महेश तेंडुलकर यांनी, ‘वास्तवतेच्या जवळ जात ‘ध’ चा ‘मा’ संदर्भातील गैरसमज दूर करणारी, आनंदीबाई यांची अंधारी बाजू समोर आणणारी कादंबरी’ अशा शब्दात या ऐतिहासिक कादंबरीचा गौरव केला. हा विषय सोपा नव्हता. जिची प्रतिमा इतिहासात डागाळलेली आहे, तिच्यावर लिहिणे सोपे नव्हते. ते एक आव्हान होते. हे आव्हान नीला नातू यांनी समर्थपणे पेलल्याचे कादंबरी वाचल्यावर लक्षात येते. कादंबरीची भाषा उत्तम आहे. व्यक्तिमत्त्व कोकणातील असल्याने कोकणातील काही शब्द येतात. स्वतःची कुचंबणा होत असताना आनंदीबाई यांनी कुठेही हार न मानता विलक्षण पद्धतीने मार्ग शोधला होता. इतिहास हा पुराव्यानिशी लिहावा लागतो आणि नारायणरावांच्या खुनामागे आनंदीबाई होत्या असा एकही पुरावा नाही. असेही तेंडूलकर यांनी स्पष्ट केले.
लेखिका नीला नातू यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत आपले अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. ‘आनंदीबाई रघुनाथराव’ हा विषय सुचवल्याबद्दल त्यांनी इतिहासाचे व्यासंगी प्रकाश देशपांडे यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. हे पुस्तक लिहिताना गुहागर तालुक्यातील मळण पाहिलं. तिथल्या वाड्याचा चौथरा पाहिला. गावात तळं बांधलेलं आहे ते पाहिलं. तिथे त्या सालंकृत व्हायच्या. हे तळं उत्तम असून स्थापत्यशास्त्रानुसार आवर्जून बघण्यासारखं आहे. लॉकडाऊन काळात अभ्यासासाठी वेळ मिळाल्याचे सांगितले. नातू यांनी रामशास्त्री प्रभुणे यांच्या आनंदीबाई प्रकरणातील, ‘सांप्रतकाळी स्त्रीयांना विशेष शिक्षेची तरतूद नाही. सबब करणाऱ्यांनी आनंदीबाईंचं नाव पुढे करून आपल्या माना सोडवून घेतल्या आहेत’ या प्रसिद्ध वाक्याचा पुनरुच्चार केला आणि यामागील सारा इतिहास कादंबरीत लिहिल्याचे सांगितले. अटकेपार झेंडा रोवणाऱ्या रघुनाथरावांना कर्तृत्वानुसार, पेशवेपद मिळावं असं वाटणं गैर नव्हतं मात्र त्यासाठी त्यांनी पत्करलेला मार्ग गैर होता असं निरीक्षण नातू यांनी नोंदवलं. नारायणरावांची मुंज-बारसं रघुनाथरावांनी केलं होतं. इतकं प्रेम असताना पराकोटीचा द्वेष कसा निर्माण झाला असेल? यामागे सत्तेची लालसा हे इतकंच कारण नसल्याचं मत नातू यांनी मांडलं.
‘आनंदीबाई रघुनाथराव’ या ऐतिहासिक कादंबरीच्या निमित्ताने साक्षात जणू आनंदीबाई यांचे व्यासपीठावर अनोख्या पद्धतीने ‘शिंगतुतारी’च्या निनादात पालखीतून व्यासपीठावर आगमन झाले. पालखी व्यासपीठावर आल्यावर मान्यवरांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले. वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी प्रास्ताविकातून, वाचनालयाच्या आप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्रातर्फे मळण (शृंगारतळी) गावी आनंदीबाई पेशवे यांचे अभ्यास-संशोधन स्मारक होण्यासाठी प्रकाश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जातील असे जाहीर केले.
लेखिका संध्या साठे-जोशी यांनी ‘आनंदीबाई रघुनाथराव’ या ऐतिहासिक कादंबरीच्या लेखिका नीला विवेक नातू यांचा परिचय करून दिला. पुष्करसिंह पेशवे आणि सौ. आदितीदेवी पेशवे-अत्रे यांनी पेशवे कुटुंबियांच्या वतीने लेखिका नीला विवेक नातू उभयतांचा सत्कार केला. दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे यांनी या ग्रंथ प्रकाशनामागील प्रकाशकीय भूमिका मांडली. धीरज वाटेकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार मनिषा दामले यांनी मानले.