(चिपळूण)
मत्स्यगंधा एक्स्प्रेसने कारवार ते चिपळूण प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी चिपळूण रेल्वे स्थानकात घडली. या पर्समध्ये रोख रक्कम, दागिने असा १ लाख २० हजार किमतीचा ऐवज होता. या प्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद विनोदा सतीश मंगलुरकर (नवी मुंबई) यांनी दिली आहे. विनोदा मंगलुरकर या मत्स्यगंधा एक्स्प्रेसने १ ते २ फेब्रुवारीदरम्यान कारवार ते चिपळूण प्रवास करीत होत्या. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स चोरली. आतील साहित्य काढून घेत त्याने ती पर्स शेजारील डब्याच्या बाथरूममध्ये कचऱ्याच्या डब्यात टाकून दिली.
पर्समधील मोबाइल, ९० हजार किमतीची सोन्याची चेन, रोख रक्कम ५ हजार ५०० रुपये, यासह अन्य साहित्य मिळून १ लाख २० हजार किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. हा प्रकार मंगलुरकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस स्थानकात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकण रेल्वेमध्ये सातत्याने पर्सचोरीच्या घटना घडत आहेत. मात्र अजूनही त्यातील चोरटे सापडलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.