(चिपळूण)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज चिपळूणमध्ये येत असून येथील इंदिरागांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मैदानात त्यांची जनसंवाद सभा होणार आहे. यासभेमध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहे.
चिपळूण शहरात सर्वत्र शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर देखील लावण्यात आले असून जोरदार अशी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असून सोमवारी ते रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणार आहेत. राजापूर, रत्नागिरी, देवरुख नंतर सायंकाळी ५ वाजता त्यांचे चिपळूणमध्ये आगमन होणार असून यावेळी ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. परंतु या जनसंवाद बैठकीचे मोठ्या सभेत रूपांतर होण्याची श्यक्यता आहे.
शरद पवार गटाकडून बॅनरबाजी
विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आगामी उमेदवार प्रशांत यादव यांनी शहरात ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर झळकावले असून ते बॅनर लक्षवेधी ठरत आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गटाने देखील बॅनर आणि भगवे झेंडे लावून जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडी एक प्रकारे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.