(जाकादेवी/ वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील ओरी येथील प्राथमिक शाळा नं.१ केंद्रशाळेत कला आविष्काराचा बहारदार विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम रंगल्याने या चिमुकल्या बालकलाकारांचे ग्रामस्थांनी खास कौतुक केले. विशेष म्हणजे यावेळी शाळेत पाढे पाठांतर स्पर्धेत सर्वप्रथम आलेल्या कु.श्रावणी सिद्धार्थ जाधव या अभ्यासू विद्यार्थ्यांनीला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संकेत देसाई यांच्या कुटुंबीयांनी कै.श्रीधर देसाई यांच्या स्मरणार्थ उत्तम दर्जाची सायकल प्रोत्साहनपर भेटरूपाने दिली.
वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित कार्यक्रमात विनोदी नाटिका, लोकनृत्य ,लावणी, पर्यावरण विषयक जनजागृती ,वैयक्तिक व सामूहिक नृत्य अविष्कार सादर केला.प्रारंभी मुख्याध्यापक श्री. धनंजय आंबवकर यांनी राबविलेल्या शालेय उपक्रमांची माहिती दिली.तदनंतर विविध स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी गावचे सरपंच सौ.स्वाती देसाई ,उपसरपंच अनिल घवाळी,प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संकेत देसाई , शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष वसंत जाधव,माजी अध्यक्ष नंदकुमार देसाई, ग्रामस्थ सुधाकर घवाळी , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष स्वप्निल शिंदे,उदय देसाई, सिद्धार्थ जाधव यांसह अनेक ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेत ३० पर्यंत पाढे पाठांतरात सर्वप्रथम आलेली विद्यार्थीनी कु.श्रावणी सिध्दार्थ जाधव हिला गावचे माजी उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संकेत उर्फ बंड्या देसाई यांनी आपले वडील कै. श्रीधर देसाई यांच्या स्मरणार्थ उत्तम दर्जाची सायकल श्रीमती शुभदा देसाई यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थीनींला भेटरूपाने दिली.
स्नेहसंमेल कार्यक्रमाचे उद्घाटन गावच्या सरपंच सौ. स्वाती देसाई, उपसरपंच अनिल घवाळी, ओरी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश कळंबटे, संकेत देसाई, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष स्वप्निल शिंदे, उदय देसाई, वसंत जाधव ,सुधाकर घवाळी, सिध्दार्थ जाधव, प्रमिला देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रामदास चव्हाण, समिक्षा पवार, गणपती पडूळे यांनी केले. शेवटी आभार मुख्याध्यापक धनंजय आंबवकर यांनी मानले.