(अमळनेर)
काळ्या मातीला हिरवा शालू नेसवून आपल्या कवितेच्या माध्यमातून सेवा केलेले कवी ना. धों. महानोर, जीवनाचे मर्म आपल्या अहिराणी रचनेच्या माध्यमातून मांडणार्या बहिणाबाई चौधरी यासारख्यांनी खान्देशचे साहित्य समृद्ध केले. राजकारणातील लोकांना साहित्याचा गंध नसतो, असे म्हणता येणार नाही. साहित्यातून वागावे कसे याची शिकवणूक मिळते. तळागाळातील लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारण, समाजकारण केले जाते. उत्तम साहित्यातून समाजसेवेचे मूल्य मिळतात. तुमचे मन शुद्ध असेल तर, तुम्ही जीवनात अयशस्वी होऊ शकत नाहीत. पुस्तके जगाला जवळ आणण्याचे काम करतात, असे प्रतिपादन संमेलनाच्या उद्घाटक सुमित्रा महाजन यांनी केले.
लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते शुक्रवारी येथे 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे येथील प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर उद्घाटन करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे सपत्नीक उपस्थित होते. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, अशी भावना मराठी जनतेची आहे. तिला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी जशी शासनाची आहे, तशीच आपल्या सर्वांची आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी हा भाषा-भ्यासाचा क्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असावा. गाव खेड्यातील गरिबांच्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे, हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे मत संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.
शोभणे यांनी मराठी भाषा, लेखक, धर्म, संस्कृती, परंपरा व आजच्या तरुणाईचे मत मांडले. ते म्हणाले की, मराठी साहित्य व भाषा टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याची शासनाबरोबर वेगवेगळ्या समाजघटक, संस्थांची जबाबदारी आहे. प्रसार माध्यमांनी मराठी भाषा व व्यवहाराला अग्रक्रम देण्याची गरज आहे. अभिरुची वाढविणारे दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याची जबाबदारी दृकश्राव्य वाहिन्यांवरील निर्मात्यांची आहे तसेच वृत्तपत्रांतून दर्जदार मजकूर देण्याचे काम संपादकांचे आहे.