(रत्नागिरी / प्रतिनीधी)
शहरात काँक्रीटीकरण रस्ते तयार करण्यास सुरुवात झाली आहे. या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे पादचारी नागरिकांसह एस टी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काँक्रीटीकरणाचे काम ही धिम्यागतीने चालू असल्याचे पहायला मिळत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरातील मुख्य रस्त्याना १०० कोटी खर्चून काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामाला दोन आठवड्यापूर्वी साळवी स्टॉपपासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मारुती मंदिरपर्यंत एक मार्गिका बंद करून काँक्रीटीकरण करण्यात आले. तसेच नाचणे रोडकडे जाणाऱ्या रस्त्याचेही काँक्रीटीकरण होत असल्याने पर्यायी मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांना दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडीने घेरले आहे. यातून नागरिक आणि वाहनचालक चांगलेच हैराण झाले आहेत.
विशेष म्हणजे, सकाळी, सायंकाळी काम-धंद्यासाठी येण्या-जाण्याच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे. यावर कोणाचेही प्रभावी नियंत्रण नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रत्नागिरीत येण्यासाठी प्रवाशांना हातखंब्यापासून आधीच खड्ड्यातून प्रवास करावा लागतो त्यातच आता शहरांतील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडी अन् रत्नागिरी हे एक नातेच तयार झाले आहे. शहरातील महत्वाच्या रस्त्यावरच सतत वाहतूक जामची समस्या निर्माण होत असल्याने वाहनधारक वैतागले आहे. सुरू असलेले काँक्रीटीकरणाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता नाही. मात्र या वाहतूक कोंडीतून सुटका होणार तरी कधी? असा प्रश्न आता वाहनचालकांमधून विचारला जात आहे.