(फुणगूस / एजाज पटेल)
संगमेश्वर-मुंबई गोवा महामार्ग ते संगमेश्वर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चक्क शौचालयाचे घाणेरडे पाणी वाहत असून संपूर्ण परिसरात भयंकर अशी दुर्गंधी पसरली आहे. तर या घाणेरड्या पाण्यामुळे रोगराई पसरून प्रवाशी तसेच वाहन चालकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. परंतु रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. संगमेश्वर ते धामणी दरम्यान या कामाला गती देखील देण्यात आली आहे. या कामामुळे येथील संगमेश्वर रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता आधीच अडचणीचा बनला आहे. प्रवाशी तसेच वाहन चालकांना या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत आहे. नुकतीच या रस्त्याची दुरुस्ती देखील करण्यात आली असली तरी माती खोदाईमुळे अडचण कायम असताना आता मात्र एका वेगळ्याच समस्येत हा रस्ता अडकला आहे. त्यामुळे पुन्हा हा रस्ता चर्चेचा विषय बनला आहे.
रस्त्याच्या दरम्यान किंवा आजूबाजूला ड्रेनेज लाईन फुटल्याने शौचालयाचे सर्व पाणी रस्त्यावर आणि दोन्ही बाजूने वाहत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेले काही दिवस ही परिस्थिती कायम आहे. या बाबत येथील जबाबदार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रथम त्यांनी हात झटकले, नंतर मात्र दुरुस्तीसाठी कळविण्यात आले असल्याची सारवासारव देखील केली. मात्र या दुर्गंधीमुळे प्रवाशी व वाहन चालक हैराण झाले असून लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.