(चिपळूण)
तालुक्यातील निवळी येथे एका घरामध्ये शिरलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन अधिकाऱ्यांना यश आले आहे. ही घटना मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. भर वस्तीत बिबट्या आल्याने निवळी पंचक्रोशीत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
निवळी येथील कातळवाडी येथे दि. ३१ जानेवारी रोजी पहाटे ४.१० वाजण्याच्या सुमारास जयराम रा. मोरे यांचे घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीमध्ये बिबट्या आल्याची माहिती पोलिसपाटील निवळी यांनी भ्रमणध्वनीद्वारे वनपाल सावर्डे यांना दिली. यानुसार वन विभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता हा बिबट्या हा कोंबड्याच्या वासाने राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या (पडवी) खोलीमध्ये बसला असल्याचे दिसून आले. या खोलीच्या दरवाजाच्या अर्ध्याभागावर लाकडी फळ्या व पत्र्याने बंद करून दारासमोर पिंजरा लावून बिबट्याला सुखरूप जेरबंद करण्यात वन अधिकाऱ्यांना यश आले.
त्यानंतर घरामध्ये आलेल्या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये सुरक्षितरीत्या ताब्यात घेतल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी चिपळूण यांनी पाहणी केली असता हा बिबट्या हा साधारणपणे २.५ ते ३ वर्षांचा असून ती मादी असून तीला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी सुस्थितीत असलेची खात्री झाल्याने वन विभागाचे बचाव पथकाने बिबट्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
या बिबट्यासाठीचे बचावकार्य विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती राजश्री कीर, वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण व त्यांचे अधिनस्त कर्मचारी उमेश आखाडे वनपाल सावर्डे, अनंत मंत्रे वनरक्षक नांदगाव, अश्विनी जाधव वनरक्षक गुढे, दत्ताराम सुर्वे वनरक्षक, राहुल गुंठे वनरक्षक कोळकेवाडी, नंदकुमार कदम वाहनचालक व गणेश भागडे तसेच बचाव पथकामध्ये पोलिस अधिकारी, स्थानिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तत्काळ माहिती देण्याकरता वन विभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.