(रत्नागिरी)
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण ढवळू लागले आहे. जिल्ह्यामध्ये अनेक उलथापालथ होणार असून, त्याची सुरुवात चिपळूणमधून झाली आहे. आता उत्तर रत्नागिरीतही भाजपमध्ये धमाका उडणार असून गुरुवारी मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात दापोली-मंडणगडचे माजी आमदार आणि शिवसेना (उ.बा. ठा.) गटाचे नेते सूर्यकांत दळवी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करीत भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. त्यांच्यासह मंडणगडमध्येदेखील प्रकाश शिगवण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होत आहे.
भाजपाने आगामी लोकसभेसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड रत्नागिरी हे मतदारसंघ टार्गेट केले आहेत. राज्यातील ४८ पैकी ४२ लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा खासदार निवडून आणण्याचा चंग भाजपाने बांधला आहे. आता त्या दृष्टीने कोकणवर लक्ष केंद्रीत केले असून रायगड आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या टार्गेटवर आहेत. त्या दृष्टीने या दोन्ही जिल्ह्यात आगामी काळात मोठ्या घडामोडी होणार आहेत. त्याची सुरुवात आज उत्तर रत्नागिरीतून होत आहे.
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधीच पक्षप्रवेश
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दि. ४ व ५ रोजी कोकण दौऱ्यावर येत आहेत. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या दौऱ्याच्या आधीच भाजपने धक्का दिला आहे. शिवसेनेच्या माजी आमदारांना भाजपमध्ये सामील करून घेत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्षप्रवेश होत आहे. तब्बल सहावेळा दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघातून सूर्यकांत दळवी यांनी आमदारकी भूषविली. मात्र, त्यांना पक्षाने वरिष्ठ स्तरावर स्थान दिले नाही. त्यामुळे अनेक दिवस ते नाराज होते. याच कालावधीत माजी मंत्री रामदास कदम आणि सूर्यकांत दळवी तसेच माजी आ. संजय कदम आणि दळवी, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यातील राजकीय वाद रंगले. मात्र, अनेकवेळा दळवी यांनी आपण पक्ष सोडणार नाही असे सांगितले. मात्र, आज दुपारी मुंबई येथे सूर्यकांत दळवी भाजपमध्ये प्रवेश करीत कमळ हाती घेत आहेत. या पक्षप्रवेशामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार योगेश कदम आणि महायुतीची ताकद वाढणार आहे.