(दापोली)
कृषी विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना उत्तम शिक्षण आणि रोजगाराच्या नूतन संधी उपलब्ध करून देण्यासाठी, अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी ॲग्रीविजन कार्यरत आहे. विविध प्रादेशिक आणि राष्ट्रीय कृषी संमेलन, प्रदर्शन इत्यादींच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात ॲग्रीविजन काम करते.
मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पद्मश्री संजय पाटील यांच्या हस्ते ‘ विकसित कृषी : भारत @ 2047 ’ या संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी संमेलनाचे विशेष अतिथी श्री. प्रफुल्लजी आकांत (अभाविप राष्ट्रीय सह संघटन मंत्री ), डॉ. अमित देवगिरीकर (कार्यक्रम सचिव), श्री मनीष फाटे (ॲग्रिव्हिजन राष्ट्रीय सहसंयोजक), प्रथमेश रासकर ( ॲग्रिव्हिजन कोकण प्रांत संयोजक), प्रथमेश दिघे (ॲग्रिव्हिजन संमेलन संयोजक), कु.श्रेया चौगुले (विद्यापीठ मंत्री) हे मान्यवर मंचावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधीत करताना पद्मश्री संजय पाटील यांनी आत्मनिर्भर शेतकरी, स्वयंपूर्ण शेती या विषयावर मार्गदर्शन केले. “सेंद्रिय शेतीकरिता प्रयोग आणि तपाची आवश्यकता आहे, तपाला वेळ लागतो पण मिळणारे फळ सत्वगुणी मधुर असते” हे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच प्रफुलजी आकांत यांनी कृषीबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
तांत्रिक आधारावर शेतीसाठी जागतिक संधी आणि AI चे जग त्याचबरोबर पेटेंट ची नोंदणी कशी करावी यांवर डॉ. प्रशांत बोडके व डॉ. अमित देवगिरीकर यांनी अनुक्रमे या गोष्टी सहज भाषेत विद्यार्थांसमोर मांडल्या. श्री दिनेश भोसले यांनी आधुनिक पशुपालनामधील भविष्याचा विचार करता या क्षेत्रातील अडचणी, त्यावर उपाययोजना आणि नूतन संध्या यावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सागर कोपर्डेकर यांनी निर्यातीसाठी चा भारताकडून असणाऱ्या अपेक्षा आणि भारताची सध्याची स्थिती व संधी यांवर चर्चात्मक संवाद साधला. आपल्या संमेलनाचा मुख्य विषय असलेला 2047 चा कृषी क्षेत्रातील भारत याविषयी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे राष्ट्रीय सह संघटन मंत्री श्री. प्रफुलजी आकांत यांनी 2047 चा भविष्यातील भारत, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर उभा केला. समारोप सत्रात डॉ. संजय भावे (कुलगुरू, डॉ बासाकोंकृवि, दापोली) यांनी आपली उपस्थिती दर्शविली, आपल्या संभाषणात कृषी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच ॲग्रीविजन जे कृषी क्षेत्रातील मुलांसाठी काम करतं त्याला कौतुकाची थाप दिली.
कोकण प्रदेश (अग्रीव्हिजन कोकण प्रांत संयोजक) प्रथमेश रासकर यांनी वर्तमानातील विकसनशील भारताला भविष्यात विकसित कृषी भारत करणे हे आजच्या कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे उद्दिष्ट असावे असे उपस्थितीतांना उद्देशून म्हणाले. “संमेलनामध्ये महाराष्ट्रातील कृषी शिक्षण घेणारे 500हून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, तसेच अनेक प्राध्यापकांनी देखील आपला सहभाग नोंदवला. या संमेलनामध्ये ॲग्रीव्हिजन आयामाच्या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले” असे कार्तिकेश भुवड यांने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले.