(रत्नागिरी)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागातील दोन निरीक्षकांच्या रत्नागिरी जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक आणि लांजा युनिटच्या निरीक्षकांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी नवीन दोन निरीक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात ३ वर्ष पूर्ण झालेल्या आणि ज्या अधिकाऱ्यांचा हा स्व-जिल्हा आहे, त्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक संजय दळवी यांची कागल सीमा तपासणी नाका येथे बदली झाली आहे. ते मुळचे रत्नागिरी जिल्ह्याचे रहिवासी असल्याने त्यांची बदली झाली. वर्षभरापूर्वीच ते सिंधुदुर्ग भरारी पथकातून बदली होवून जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या जागी कुडाळच्या भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकर यांची नियुक्ती झाली आहे.
लांजा युनिटचे निरीक्षक विक्रमसिंह मोरे यांची जिल्ह्यातील सेवा तीन वर्ष होत आली होती. त्यामुळे त्यांची नागपूर येथे बदली झाली आहे. रिक्त झालेल्या लांजा युनिटच्या निरिक्षकपदी कणकवलीहून प्रभात सावंत यांची नियुक्ती झाली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तत्काळ बदलीच्या ठिकाणी पदोभार स्वीकारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.