(संगमेश्वर / प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून निवृत्त झालेल्या कामगारांची राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना ही एकमेव संघटना राज्यभर कार्यान्वित आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घकाल प्रलंबित असून त्यांच्या सोडवणुकीसाठी संघटनेच्या वतीने प्रशासन व शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करूनही महामंडळ व महाराष्ट्र शासन स्तरावर दीर्घकाल त्यांची दखल न घेतल्याने शासनाचे लक्ष त्यांच्या मागण्यांकडे वेधून घेण्यासाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी अकरा वाजता राज्यव्यापी निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
सदर आंदोलनाचा मुख्य कार्यक्रम आझाद मैदान मुंबई या ठिकाणी होणार असून राज्यभर प्रत्येक विभागीय कार्यालयासमोर देखील संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानुसार रत्नागिरी येथील रा प महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर देखील संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत.
निवृत्त रा प कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत. सुमारे तीन वर्षापासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची अंतिम देयके अद्याप प्रलंबित आहेत ती तातडीने अदा करण्यात यावीत. थकीत महागाई भत्ता, थकीत घर भाडे भत्ता लवकरात लवकर अदा करण्यात यावा. सर्व थकीत देण्यांवर 8% दराने व्याज देण्यात यावे. सेवेतून निवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या व वीस वर्षे सेवा करून बडतर्फ झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वर्षभर रा प महामंडळाच्या सर्व गाड्यांमधून प्रवासासाठी विना अट मोफत पास देण्यात यावा. दीर्घकाल रखडलेली पेन्शन प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढा. शासनमान्य वेतन करारानुसार मान्य केलेली वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात यावी. रोजंदार कालावधीचे उपदान देण्यात यावे. सेवानिवृत्तांच्या मुलांसाठी नोकरीत ५% आरक्षण मिळावे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाची कामगार निवृत्ती वेतन योजना लागू आहे. सदर योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी सेवेत असताना नियमानुसार वर्गणी भरूनही मिळणारी पेन्शन ही अत्यंत तुटपुंजी आहे त्यातून किमान दोन माणसांचाही उदरनिर्वाह होऊ शकत नाही. सदर पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा.
या आणि अशा दीर्घकाल दुर्लक्षित केलेल्या मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांना नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. शासनाला संघटनेची विनंती आहे, की शासनाने आणि प्रशासनाने तातडीने या मागण्यांमध्ये लक्ष घालून वयोवृद्ध निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी विभागीय अध्यक्ष शेखर सावंत , विभागीय सचिव पी एस जाधव राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना यांनी केले आहे .