(आळंदी)
तीन अल्पवयीन मुलांवर महाराजाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना आळंदीत उघडकीस आली. या महाराजावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर उर्फ आळंदीकर (वय ५२, रा. आळंदी ) असे अटक केलेल्या महाराजाचे नाव आहे. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आळंदीमध्ये राहणारा दासोपंत महाराज येथे मृदुंग वादन शिकवणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेचा संचालक आहे. यामध्ये जवळपास ६० ते ७० विद्यार्थी दासोपंत यांच्याकडे मृदुंग वाद्य शिकण्यासाठी येतात. मात्र दोन महिन्यापूर्वी दासोपंत यांनी एका विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने अन्य दोन अल्पवयीन मुलांसोबतही अनैसर्गिक कृत्य केले. या तीन मुलांवर त्याने अनेकवेळी अनैसर्गिक अत्याचार केले व कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली.
यातील एका मुलाने आपल्या वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर त्याच्या पालकाने थेट आळंदी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाकाळ केली. मात्र नंतर वरिष्ठांनी यात हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा दाखल होताच अन्य दोन मुलांनीही महाराजांवर आरोप केले. अशाप्रकारे दासोपंत महाराजांचं बिंग फुटलं. आळंदी पोलिसांनी याप्रकरणी पॉस्को कलमाखाली गुन्हा दाखल करून आरोपी महाराजास अटक केली आहे. त्याचबरोबर महाराजाकडून आणखी कुणी पीडित असल्यास त्यांना पुढं येण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय. या घटनेमुळं वारकरी संप्रदाय हादरला आहे.