जय जय रघुवीर समर्थ. मोकळेपणा पोकळ आकाश अवकाश काहीच नाही तिथे वायू पण नाही तिथे ब्रह्माचा जन्म झाला. नंतर वायूपासून वन्ही झाला. त्यापासून पाणी झालं, अशी त्याची अघटित करणी घडली. पाण्यापासून सृष्टी झाली, कोणत्याही खांबांशिवाय ती उभारली. अशी विचित्र कला केली त्याचं नाव देव. देवाने क्षितीज निर्माण केले त्याच्या पोटामध्ये पाषाण असतात आणि त्यालाच विवेकहीन लोक देव म्हणतात.
सृष्टी निर्माणकर्ता तो या सृष्टीच्या पूर्वीदेखील होता मग त्याची ही सत्ता निर्माण झाली. कुंभार मडके घडवण्याआधी देखील आहे, मडके म्हणजे काही कुंभार नव्हे. देव पूर्वीपासूनच आहे. पाषाण म्हणजे देव नाही. मातीचे सैनिक केले पण करणारे वेगळेच राहिले. कार्यकारण एक केले तरी एक होणार नाही. मात्र पंचभूतिक निर्माण होईल, निर्गुण असं काही निर्माण करता येणार नाही. कार्य करण्याचा हा विवेक भूतांपुरता नाही. अवघी सृष्टी ज्याने केली सृष्टीपासूनही वेगळा आहे, तिथे संशय बाळगू नये. खांबाला लावलेल्या सूत्रांची बाहुली ज्या पुरुषाने नाचविली तोच बाहुली असं कधी घडेल का? अंधारातील पडद्यावर नाना चित्रांच्या छाया दाखवून दाखवतात, ही सृष्टीसारखी रचना आहे. सूत्रधार असतो तो हे करतो पण तिथे कोणी व्यक्ती नसते, त्याप्रमाणे सृष्टी करणारा देव पण तो सृष्टीचा भाव नाही. त्याने नाना जीव निर्माण केले तो जीव कसा असेल? जे जे करायला लागते तेथे तो कसे घडवतो म्हणून लोक संदेह निर्माण करतात.
सृष्टी ही अशीच आहे. ज्या प्रमाणे शिखर निर्माण केले परंतु शिखर म्हणजे कर्ता नव्हे. त्याप्रमाणे ज्याने जग निर्माण केले तो पूर्णपणे वेगळा आहे. एक मूर्खपणामुळे जग म्हणजे जगदीश असे म्हणतात पण जगदीश तो वेगळा आहे. जगनिर्मिती ही त्याची कला आहे. तो सर्वांमध्ये असला तरी सर्वांपेक्षा वेगळा आहे, म्हणून भुतांचा चिखल, त्याच्यापासून आत्माराम अलिप्त आहे. अविद्येमुळे, मायेच्या प्रेमामुळे तो सत्य वाटतो. मायेची उपाधी जगडंबर असा विपरीत विचार कुठेच नाही. म्हणून जग मिथ्या, खरा तो आत्मा आहे. अंतर्बाह्य अंतरात्मा भरून उरलेला आहे. त्याला देव म्हणावे बाकी सर्व खोटे असा वेदान्ताचा अर्थ आहे.
सर्व पदार्थ वस्तू नाशवंत आहेत, हे अनुभवाला येते म्हणून भगवंत हा सर्व पदार्थांपेक्षा वेगळा आहे. देव शुद्ध आणि अचल आहे असं शास्त्रांमध्ये सांगण्यात आले. त्याला कधीही चंचल म्हणू नये. देव आला, देव गेला, देव जन्मला, देव मेला असं म्हणायला पापी लोकांना काय जाते? जन्ममरणाची वार्ता देवासंदर्भात होत नाही. देव ज्यांच्या सत्तेने अमर आहेत त्याला मृत्यू कसा येईल? निर्माण होणे आणि मरणे, येणे-जाणे, दुःख भोगणे हे त्या देवाचं करणे आहे, मात्र तो यापासून वेगळा आहे. अंत:करण, पंचप्राण, बहुतत्वी पिंडज्ञान या सर्वांना नाश आहे म्हणून ते देव नाहीत. कल्पनारहित त्याचं नाव भगवंत. तिथे दुसर काही चालत नाही. तेव्हा शिष्याने विचारले हे ब्रह्माड कसे केले? पहाणारा दृश्य पाहतो त्याप्रमाणे निर्गुणाला गुण कसे ब्रम्हांड करणारा कोण? त्याला कसे ओळखायचे? देव सगुण की निर्गुण आहे मला सांगावे, असा प्रश्न त्याने विचारला आहे. हा भाग येथे संपला असून पुढील कथा ऐकुया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127