(रत्नागिरी)
पैसे परत करण्यास अनेक दिवस टोलवाटोलवी केल्यानंतर फिर्यादी यांना उसन्या घेतलेल्या रक्कमेचा धनादेश दिला. मात्र खात्यात पैसे नसल्याने धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने २ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. प्रथमेश प्रकाश चव्हाण (वय ३२, रा. चांदेराई, रत्नागिरी) असे तरुणाचे नाव आहे. सदर घटना २०१९ ला घडली होती.
प्रथमेश हा आर्थिक अडचणीत असताना त्याने फिर्यादी डोर्लेकर यांच्याकडून उसने पैसे घतले होते. पैसे परत करण्यास अनेक दिवस टोलवाटोलवी करत होता. शेवटी रक्कम परत करण्यासाठी वारंवार फिर्यादींनी तगादा लावल्यावर प्रथमेश यांनी फिर्यादी डोर्लेकर यांना उसन्या घेतलेल्या रक्कमेचा धनादेश दिला. पण, त्याच्या खात्यात पैसे नसल्यामुळे तो धनादेश वटला नाही. यामुळे अँड.मंदार भावे यांच्यामार्फत फिर्यादी यांनी याचिका दाखल केली होती.
या संदर्भात रत्नागिरी चौथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती रॉड्रिंक्स यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने चव्हाण याला २ महिने तुरुंगवास आणि २ लाख २४ हजाराची नुकसान भरपाई, भरपाई न दिल्यास आणखी १५ दिवसांची शिक्षा सुनावली आहे.