(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे सोनगिरी ग्रामपंचायत, मुचरी ग्रामपंचायत व मौजे असुर्डे ग्रामपंचायत या गावातील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैव्यवहारप्रकरणी देवरूख संगमेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु त्यांनी अद्याप तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषण करण्यात येइल असा इशारा युवा एकता सामाजिक संस्थेने एका निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हाधिका-या ना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गटविकास अधिकारी तक्रारीची दखल घेत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली, परंतु ते देखील तक्रारीची दखल घेण्यास टाळटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने स्मरणपत्र काढून देखील कोणतीही कारवाई होत नाही.
मागील एक वर्षापासून तिन्ही ग्रामपंचायत मधील नागरिक यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करत असून त्यावर अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. जिल्हा अधिकारी यांनी संबंधितावर कोणतीही कारवाई न केल्यास दि.२६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ :०० वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे तिन्ही ग्रामपंचायत च्या नागरिकांकडून बेमुदत आमरण उपोषणाची हाक देण्यात आली आहे.