(रत्नागिरी)
मुंबईमध्ये टाटा मॅरेथॉनमध्ये फ्रेंण्ड्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने आणि रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक (आरएचपी) फाउंडेशन यांच्या मदतीने रत्नागिरीतील दिव्यांगांनी मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन मॅरेथॉन पूर्ण केली. राज्यातून विविध भागांतून आलेल्या ३५ दिव्यांगांनी यात भाग घेतला.
दरवर्षी २१ जानेवारीला टाटा मॅरेथॉन सुदृढ आणि दिव्यांग अशा दोघांसाठी आयोजित केली जाते. दिव्यांगासाठीच्या २१ प्रकारातील सर्व दिव्यांग सहभागी होऊ शकतात. वयोगटाप्रमाणे पहिले तीन क्रमांक प्रत्येक विभागातून काढून बक्षीस दिले जाते. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाते.
यावर्षी आरएचपी फाउंडेशनतर्फे सादीक नाकाडे, अनुपम नेवगी, खुदबुद्दीन मुकादम, सचिन शिंदे, समीर नाकाडे, यासीर मुकादम, आरमान भाटकर, नफिस वाघू सहभागी झाले होते. सर्व प्रकारचे दिव्यांग एकत्रित पाहून दिव्यांगांच्या मनातील न्यूनगंड निघून गेला. सर्वजण पूर्ण उत्साहाने सहभागी झालेले पाहायला मिळाले. सर्वजण खूप आनंदी होते. या मॅरेथॉनमधून भरपूर उर्जा घेऊन, खूप काही शिकून परत आपापल्या गावी रवाना झाले. दिव्यांगांचा उत्साह पाहून सुदृढ लोकही खूप आकर्षित झाले. दिव्यांगांच्या चेहर्यावरीन वाहणारा आनंद उत्साह पाहून तेसुद्धा अचंबित झाले. यामुळे त्यांच्यातील उमेद, आत्मविश्वासही वाढला.