(नाशिक)
अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा साजरा होत असताना शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नाशिकमध्ये सहकुटुंब पंचवटीतील काळाराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी उद्धव ठाकरेंसमवेत पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंचा भगवे वस्त्र, गळ्यात रूद्राक्ष माळ अशा पेहरावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हयातीत रूद्राक्षाची माळ कायम जपली होती.
उद्धव ठाकरे काळाराम मंदिर परिसरात दाखल होताच त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करण्यात आली. ते पूर्व महाद्वारातून काळाराम मंदिरात दाखल झाले. प्रथम त्यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रभू श्रीरामाचे दर्शन त्यांनी घेतले. उद्धव ठाकरेंच्या हस्ते महापूजा आणि महाआरती झाली. यावेळी मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
४० फुटांचा हार घालत उद्धव ठाकरेंचे स्वागत उद्धव ठाकरे हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथून काळाराम मंदिराकडे रवाना झाले. यावेळी मुंबई नाका येथे त्यांचे ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या माध्यमातून ४० फुटांचा हार त्यांना घालण्यात आला. तसेच जेसीबीमधून फुलांची उधळणदेखील करण्यात आली.
काळाराम मंदिरात भाविकांची गर्दी
अयोध्या राम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील काळाराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काळाराम मंदिरात आकर्षक अशी द्राक्षांची सजावट करण्यात आली होती. सकाळपासूनच भाविकांनी प्रभूरामाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. काळाराम मंदिरात करण्यात आलेली द्राक्षांची सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने नाशकात आगमन झाले होते. नाशिकच्या सुप्रसिद्ध काळाराम मंदिरात आरती केल्यानंतर त्यांनी गोदामाईची आरती केली. यावेळी हजारो शिवसैनिक रामकुंड परिसरात उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांचे रामकुंड परिसरात आगमन होताच शिवैनिकांनी पारंपरिक ढोलताशे, शंखध्वनीच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, सियावर रामचंद्र की जय… अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. पौरोहित संघाचे अध्यक्ष सुहास शुक्ल यांनी पौरोहित्य केले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शिवसेनेचे आमदार, खासदार, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, रवींद्र मिर्लेकर, विजय करंजकर, विनायक पांडे, संजय गायकर, सचिन ठाकरे, बाळासाहेब कोकणे, विलास शिंदे, वैभव खैरे, निलेश साळुंखे यांच्यासह हजारो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.