(रत्नागिरी)
अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळा जिल्ह्यात ‘राम मंदिर ते ग्राम मंदिर’ होत आहे. आजचा दिवस घरोघरी दिवाळी साजरी होत आहे. मंदिर होणं ही आपली अस्मिता होती. ते स्वप्न पूर्ण करणारे नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद मोदी यांचा अभिमान आहे, असे सांगतानाच जिल्ह्यामध्ये सुरु होणाऱ्या ‘डिप क्लिनिंग’ मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी येथील जयेश मंगल पार्कमध्ये श्री राम मंदिर ट्रस्ट आणि नगरपरिषदेच्या वतीने सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. याठिकाणी पालकमंत्री सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्याधिकारी तुषार बाबर, वकील राजशेखर मलुष्टे आदींसह श्री राम मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. सुरूवातीस पालकमंत्री सामंत यांनी श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. ‘जय श्री राम, जय सियाराम’ च्या घोषणा देत फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
पालकमंत्री सामंत म्हणाले की, आजचा दिवस घरोघरी दिवाळीच्या उत्सव सारखा आहे. जिल्ह्यातील ४६६३ ग्राम मंदिर आणि १९६ राम मंदिरात हा सोहळा साजरा झाला. रत्नागिरीचा हा पॅटर्न महाराष्ट्राचा झाला आणि तो देशात गेला. शालेय जीवनापासून दर ५ वर्षांनी राम मंदिराचा मुद्दा चर्चेत यायचा. राम मंदिर होणं, ही आपल्या सर्वांची अस्मिता होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ती पूर्ण केली. जिल्ह्यातील १ हजार मंदिरांची स्वच्छता २ दिवसात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘डिप क्लिनिंग’ ही स्वच्छता मोहीम रविवारपासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्हावासीयांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला नागरिकांची विशेषतः महिलांची मोठी उपस्थिती होती. अभिजित गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले.