(लांजा)
जमीन जागेच्या वादातून जेसीबीच्या साहाय्याने घराच्या समोरील आणि बाजूचा भाग पाडून घराचे नुकसान आणि नासधूस केल्याच्या घटनेप्रकरणी तालुक्यातील कोचरी बेंद्रेवाडी येथील जागा मालक आणि जेसीबी चालक अशा दोघांवर लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शनिवारी सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेत घरातील महिलेला शिवीगाळ करत हात धरून महिलेला घरातून बाहेर काढल्याप्रकरणी शनिवारी २० जानेवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत संबंधित व्यक्तींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर सायंकाळी यातील मच्छींद्र महेंद्र कांबळे व जेसीबी चालक यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोचरी बेंद्रेवाडी येथील वसंत बेंद्रे आणि मच्छिंद्र महेंद्र कांबळे हे एकमेकांशी शेजारी राहणारे असून त्यांच्यात जागेवरून वाद निर्माण झालेला आहे. शुक्रवारी १९ जानेवारी रोजी फिर्यादी वसंत बेंद्रे हे कार्यकारी दंडाधिकारी लांजा येथे आले असताना यातील मच्छिंद्र महेंद्र कांबळे, सौ. दया शंकर कांबळे, दीप्ती महेंद्र कांबळे यांनी जमीन जागेच्या वादाच्या कारणावरून संगनमताने वसंत बेंद्रे यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरात घुसून त्यांची पत्नी सौ. प्रतीक्षा वसंत बेंद्रे हिला शिवीगाळ करत हात धरून घरातून बाहेर काढले. पुन्हा घरात घुसलीस तर तुझे इथेच काम करून टाकू, अशी धमकी देखील दिली. त्यानंतर त्यांनी आणलेल्या जेसीबीद्वारे क्र. (केए २८-एमए-३१०१) वसंत बेंद्रे यांच्या घराच्या समोरील आणि बाजूचा भाग पाडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
या प्रकरणी वसंत बेंद्रे यांनी लांजा पोलिस ठाण्यात शुक्रवारी १९ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायंकाळी उशिरा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शनिवारी या घटनेप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत यातील दोषींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.
त्यानुसार पोलिसांनी यातील मच्छिंद्र महेंद्र कांबळे (३३, रा. कोचरी बौद्धवाडी) आणि जेसीबी चालक अनिल घनू लमानी (३०, सध्या राहणार केळंबे स्टॉप, मूळ रा. हरकेरी तांडा, कर्नाटक) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेप्रकारणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संपूर्ण दिवसभर लांजा पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी लांजा पोलिस ठाणे सोडले.