जय जय रघुवीर समर्थ. पाणी जसे उताराकडे आपोआप धावते तसे प्रीतीचे लक्षण आहे. त्याप्रमाणे जो आत्मज्ञानी नर आहे त्याला इतर काही आवडत नाही. तिथे सारासार विचार उपयोगी पडतो. ज्याप्रमाणे कुलदेवी भगवती असेल तिथे सप्तशती पाहिजे, तिथे इतर देवांची स्तुती उपयोगी पडत नाही. अनंताचे व्रत घेतले तर तिथे भगवतगीता उपयोगी पडत नाही. त्याप्रमाणे साधूजनांना फळाशेची वार्ता उपयोगाची नाही.
शौर्याबद्दल मिळणारे कंकण जाहे ते नाकात घातले तर ते शोभेल का? त्याप्रमाणे जिथे आहे तिथेच शोभते. बाकीच्या ठिकाणी उपयोगी पडत नाही. नाना महात्म्यांनी सांगितले आहे, तिथे जे वंद्य झाले ते विपरीत करून वाचलं तर ते विचित्र होईल. मल्हार महात्म्य द्वारकेला वाचले, द्वारका महात्म्य काशीला नेले, काशी महात्म्य व्यंकटेश क्षेत्री वाचले तर ते शोभा देईल का? असं पुष्कळ सांगता येईल. जे जिथे असेल तिथे ते गोड लागते. त्याप्रमाणे ज्ञानी लोकांना अद्वैत ग्रंथाची आवड असते. योग्यांच्या पुढे अंगात आले देव आणि रत्नपारख्यापुढे दगड आणला किंवा पंडितापुढे डफडे वाजवीत बसले तर ते शोभत नाही. वेदज्ञान्यापुढे बैराग्याला आणले, निस्पृहापुढे फलश्रुती वाचली आणि ज्ञान्यापुढे कोकशास्त्रची पोथी वाचली, तर त्याचा काय उपयोग आहे?
ब्रह्मचर्यांपुढे नाचगाणी केली, तर ते राजहंसापुढे ठेवलेल्या पाण्यासारखेच; नाही का? त्याप्रमाणे अंतरनिष्ठापुढे शृंगारीक चोपडे ठेवले तर त्याचं समाधान कसं होईल? राजाला रंकाची आशा दाखवली, आणि अमृताला ताक सांगायचं! संन्याशाला व्रत आणि अनुष्ठान सांगायचं आणि चांडाळाच्या मंत्राचे उच्छीष्ट सांगायचे, कर्मनिष्ठाला वशीकरण, पंचाक्षरी निरुपण करायची त्यामुळे त्याचे अंतकरण स्वाभाविकपणे भंग पावणार नाही का? परमार्थिक जणांना आत्मज्ञान नसल्यास त्यांचे समाधान होणार नाही.
असो. ज्यांना स्वहित करायचे आहे त्यांनी अद्वैत ग्रंथ वाचन करावे. आत्मज्ञान व्हावे, समाधान मिळवावे यासाठी एकांतस्थळी निवांतपणे वाचन करावे. हा ग्रंथ परमार्थाच्या दृष्टीने होडीसारखाच तारणारा आहे. इतर जे प्रापंचिक हास्यविनोद नवरस असलेले पुस्तक दिले तर ते परमार्थाच्या दृष्टीने उपयोगी नाही. त्याच्यामुळे परमार्थ वाढतो, चुकीच्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप निर्माण होतो, भक्तीसाधना आवडते त्याला ग्रंथ म्हणतात. तो ऐकल्यावर गर्व गळून पडतो, भ्रांती मावळते आणि परमेश्वराच्या चरणी मन लागते. त्याच्यामुळे उपरती होते, अवगुण बदलतात,अधोगती टळते त्याला ग्रंथ म्हणायचं. ज्याच्यामुळे धारिष्ट्य वाढतं, परोपकार घडतात, विषयवासना नष्ट होते त्याला ग्रंथ म्हणतात. ज्यामुळे परलोकाची साधना होते, ज्यामुळे ज्ञान होते, पवित्रता येते त्याला म्हणतात ग्रंथ. ग्रंथ खूप असतात, त्यात नानाविध फलश्रुती असते पण ज्याच्यामुळे विरक्ती, भक्ती निर्माण होत नाही तो ग्रंथच नाही. मोक्षाशिवाय त्याच्यामध्ये फलश्रुती आहे ती दूराशेची पोथी आहे. ते ऐकत राहिले तर पुढे निराशाच पदरी येईल.
श्रवण केल्यावर लोभ निर्माण होईल तिथे विवेक कसा असेल? त्यामुळे निराशेचे भूत पछाडून अधोगती होईल. फलश्रुती ऐकून कोणी हे मिळवू असं म्हणतात त्यांची सहजपणे अधोगती झाली असे समजावे. पक्षी नाना फळे खातो त्यामुळे त्याला तृप्तता होते पण चकोर पक्षाचे चित्त फक्त अमृत सेवन करण्याकडे असते. त्याप्रमाणे संसारी मनुष्य संसाराची सोय पाहतो पण भगवंताचे अंश असतात त्यांना भगवंतच पाहिजे असतो. ज्ञानी लोकांना ज्ञान पाहिजे, भजन करणाऱ्यांना भजन पाहिजे आणि साधकांना इच्छेसारखे साधन पाहिजे. असं समर्थ सांगत आहेत. पुढील कथा ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127