(अयोध्या)
आज अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम गर्भगृहात विराजमान होत असून “त्या” क्षणाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना अवघा देश आणि जगातील कानाकोपऱ्यातले भारतवासी दुसरी दिवाळी साजरी करणार आहेत. एक वेगळाच उत्साह आणि भक्तीरसाची ऊर्जा देशात संचारलेली पहायला मिळत आहे. सियावर रामचंद्र की जय, जय श्रीरामच्या घोषणांनी शरयू तीरावरची अयोध्यानगरी दुमदुमली आहे. आसमंतात चैतन्य आणि पावित्र्याचा दरवळ पसरला असून, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. शेवटच्या काही तासांच्या हुरहुरीचा अनुभव घेत हजारो भाविकांनी अयोध्येत रविवारचा दिवस घालवला. सोमवारच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला निमंत्रितांचीच उपस्थिती राहणार असली, तरी मंगळवारपासून मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून अयोध्येत देशाच्या कानाकोपर्यातून भाविकांचा ओघ सुरू झाला आहे.
16 जानेवारीपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा विधीचा रविवारी सहावा दिवस होता. आज सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिजित मुहूर्तावर दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी सुरू होईल. कोट्यवधी भारतीयांच्या साक्षीने होणाऱ्या ऐतिहासिक श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. मंदिराची विविधरंगी फुलांनी सजावट करण्यात आली आहे. यासाठी तब्बल 2 हजार क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला आहे. प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य कार्यक्रमापूर्वी सकाळी दहा वाजल्यापासून मंदिर परिसरात मंगल ध्वनी गुंजणार आहे. विविध राज्यांतून आलेले 50 हून अधिक वादक वाद्ये वाजवणार आहेत. हा कार्यक्रम दोन तास सुरू राहील.
रामलल्लांच्या डोळ्यावरील पट्टी काढली जाईल. रामलल्लांच्या डोळ्यांत सुवर्णदंडिकेने पंतप्रधान काजळ लावतील. रामलल्लाला आरसा दाखवतील. अयोध्या या ‘न भूतो न भविष्यती’ सोहळ्यासाठी सज्ज झाली असून, सोमवारी शहरात 11 लाख दिवे चेतविले जाणार आहेत. शहर अडीच हजार क्विंटल फुलांनी सजविण्यात आले आहे. सर्वत्र सुरक्षा व्यवस्था चोख आहे. अयोध्येत तब्बल 25 हजारांवर जवान तैनात आहेत. रविवारी सकाळी श्री रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. सायंकाळी शय्याधिवास पार पडला. सायंकाळच्या आरतीनंतर रविवारचे सर्व विधी पूर्ण झाले.
सायंकाळी रामलल्ला विराजमान यांच्या जुन्या मूर्तीची पूजाही झाली. त्यांनाही विधिवत राम मंदिरात नेण्यात आले. रामलल्लासह लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे त्यांचे तिघे बंधू तसेच हनुमंताची अस्थायी मंदिरातील मूर्तीही राम मंदिरात नेण्यात आली. शाळिग्रामही मंदिरात दाखल झाला.
सकाळी 10 पासून 50 वाद्यांनी मंगलध्वनी
सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सकाळी दहापासून मंगल ध्वनी वाजविण्यात येईल. विविध राज्यांतून आलेली 50 हून अधिक वाद्ये वाजविली जातील. हा कार्यक्रम दोन तास चालेल. शनिवारी सायंकाळीच अयोध्येच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. आता सोमवार मावळेपर्यंत प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित पाहुण्यांनाच, तेही पास दाखवल्यावरच अयोध्येत प्रवेश मिळत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत हे अयोध्येत दाखल झाले असून मुख्यमंत्री सुरक्षा व्यवस्था आदी सर्वच घडामोडींवर स्वत: लक्ष ठेवून आहेत.
अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेच्या या भव्य सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सर्वांना पाहता येणार आहे. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर या सोहळ्याचे उद्या सकाळी 11 वाजल्यापासून थेट प्रक्षेपण दिसणार आहे. यासाठी दूरदर्शनचे 40 कॅमेरे अयोध्येत विविध ठिकाणी चित्रीकरण करणार आहेत. देशभरातील मंदिरांमध्ये, गावागावात, शहरात, जाहीर ठिकाणी हे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येईल. रेल्वे स्थानकांवरील 9 हजार स्क्रीन्सवरही हा सोहळा पाहता येणार आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यासाठी अयोध्येत दहा हजार सीसीटीव्ही लागले आहेत. 13 हजार पोलिसांची फौज तैनात आहे. यलो आणि रेड झोनमध्ये 400 सीसीटीव्ही कॅमेरे इंटिग्रेटेड कंट्रोल रुमशी जोडण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस, राखीव पोलीस, शीघ्र कृती दल, दहशतवाद विरोधी गट आणि एसटीएफची पथके सज्ज आहेत.
अयोध्या विमानतळापासून रामलल्लाच्या दारापर्यंत शृंगार
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राम मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग फुलांनी सजवण्यात आला आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत, संगीतकार अन्नू कपूर, अभिनेता रणदीप हुडा आदी रविवारी अयोध्येत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठेसाठी 22 जानेवारीला सकाळी अयोध्येत दाखल होतील. पुढे ते चार तास अयोध्येत थांबतील.
विदेशांतूनही उत्साह
तैवानसह अमेरिका, रशिया, जपान, ब्रिटन आदी जगभरातील बहुतांश देशांतून विशेषत: इस्कॉनशी संबंधित मंदिरांत प्राणप्रतिष्ठेपूर्वी उत्सवी माहौल आहे. भजन-कीर्तन सुरू आहे. जगभरात अनेक ठिकाणी सोहळ्याच्या थेट प्रसारणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
अयोध्येतील कार्यक्रम
सकाळी 10 : मंगलध्वनी
सकाळी 10.30 : पंतप्रधान मोदी दाखल
सकाळी 11 : पाहुण्यांचे आगमन
सकाळी 11.30 ते 12.30 : गर्भगृहात पूजा
दुपारी 2 ते सायंकाळी 7 : पाहुण्यांकडून रामलल्लाचे दर्शन
दुपारी 2.15 : पंतप्रधान मोदी हे कुबेर टिला येथे जाऊन शिव मंदिरात पूजा करणार
अनेक विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत हे अयोध्येत दाखल झाले आहेत, तर सकाळी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत, शेफाली शहा, संगीतकार अन्नू कपूर, अभिनेता रणदीप हुडा आदी रविवारी अयोध्येत दाखल झाले. रविवारी सायंकाळी अभिनेता रजनीकांत, रामचरण, गायक शंकर महादेवन अयोध्येत दाखल झालेे. याशिवाय अमिताभ बच्चनदेखील रात्री अयोध्येत पोहोचले. यात रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, आई कोकिलाबेन, मुले, सुना असा संपूर्ण परिवार या सोहळ्यावेळी हजर असेल. रतन टाटा, एअर इंडियाचे प्रमुख एन. चंद्रशेखरन, गौतम अदानी, अझीम प्रेमजी, कुमारमंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा, अजय पिरामल या उद्योगपतींनाही आमंत्रण आहे. अक्षय कुमार, अजय देवगण, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, प्रभास, अलु अर्जुन, ज्यु. एनटीआर, चिरंजिवी, मोहनलाल, सनी देओल, हेमा मालिनी हे कलाकार या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.