(पाचल / तुषार पाचलकर)
अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने राजापूर तालुक्यातील पाचल व परिसरात भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीतील श्रीराम सेवकांची नुकतीच पाचल येथे श्री हनुमान मंदिर येथे आढावा बैठक झाली. या बैठकीत तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पाचल ग्रामपंचायतला उपस्थित श्रीराम सेवकांकडून एक निवेदन देण्यात आले आहे, ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारी रोजी पाचल बाजारपेठेतील सर्व मटण, चिकन, मच्छी, चायनीज पदार्थ विक्रेते, तसेच मांसाहार पुरवठा करणारी हॉटेल्स, दारूची दुकाने आदी पूर्णतः बंद ठेवण्याविषयी संबंधितांना सूचना देण्याबाबत विनंती केली आहे. यावेळी श्रीकृष्ण नारकर, प्रदीप गांधी मंगेश कुडतरकर, पूजा शिगम, चेतन रेडीज, जगदीश पाथरे यासह अनेक श्रीराम सेवक निवेदन देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होते.
या निवेदनात त्यांनी पुढे म्हटलं आहे की, देशभरात विविध कार्यक्रमाचे नियोजन झाले आहे. या कार्यक्रमांना कुठेही गाल बोट लागू नये म्हणून राज्यातील काही ग्रामपंचायतीने गावातील मटण, चिकन, मच्छी,चायनीज पदार्थ विक्रेते, तसेच मांसाहार पुरवठा करणारी हॉटेल्स, दारूची दुकाने पूर्णतः बंद ठेवण्याविषयी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. आपणही या दिवशी आपल्याही गावांमध्ये अन्य कार्यक्रमासह भव्य शोभायात्रेचे आयोजन केले आहे आणि या शोभायात्रेत परिसरातून हजारोंच्या संख्येचे श्रीराम भक्त सामील होणार आहे. त्यामुळे या शोभा यात्रेला कुठे गालबोट न लागावं कोणताही अनुसूचित प्रकार न घडावा यासाठी आपण तात्परता बाळगून समंधितांना सूचना देऊन सहकार्य करावं.
याबाबत ग्रामपंचायत पाचल कमिटीने दारू विक्रेते, चिकन, मटण विक्रेत्यांना तात्काळ ग्रामपंचायत पाचल कार्यालयात बोलावून शोभायात्रा दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाबाबत निवेदन आल्याचे व त्यावर झालेली चर्चा याबाबत सविस्तर माहिती व सूचना दिल्या असता सदर सूचनांचे बार मालक, चिकन – मटण विक्रेत्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली आहे.