(रत्नागिरी)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासह पत्नी व मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आ. साळवी यांना तपासाबाबत नोटीस पाठवली आहे. मोठे बंधू दीपक साळवी यांच्यासह सोमवारी (दि. २२) हजर राहण्याची नोटीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी आ. साळवींना बजावली आहे. दरम्यान, आपण चौकशीला जाणार असल्याचे आ. राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगतानाच, सत्ताधारी माझ्या कुटुंबाला वेठीस धरत असल्याचा आरोप केला. न्यायदेवता आपल्याला योग्य न्याय देईल, असेही त्यांनी सांगितले.
ही नोटीस आल्यानंतर शुक्रवारी दुपारी आ. राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत घेत सत्ताधाऱ्यांवर आरोप केले व आपली भूमिका मांडली. ‘लाचलुचपत’च्या पथकाने गुरुवारी जवळपास १० तास घराची झडती घेतली. यावेळी अटकेसंदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊ, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेले वर्षभर आपली, भावाची, कुटुंबीयांसह पीए, ठेकेदार अशी तब्बल ७० जणांची चौकशी केली. अगदी खालच्या पातळीवर जाऊन मतदारसंघात काम करणाऱ्या ठेकेदारांना प्रश्न विचारण्यात आल्याचे आ. साळवी यांनी सांगितले.
माझ्या छोट्या-मोठ्या बंधूची, पुतण्याची, वहिनीचीही चौकशी करण्यात आली. सहावेळा अलिबागला बोलावण्यात आले, तरी अद्याप चौकशी संपलेली नसल्याचे आ. साळवी यांनी सांगितले. आपण घर बांधले त्यासाठी २५ लाखांचे कर्ज घेतले, हॉटेल बांधले त्यासाठी १५ लाखांचे कर्ज घेतले, अगदी कार्यालयाच्या उभारणीसाठीही कर्ज घेतले आहे. परंतु त्याची कुठेच नोंद ‘लाचलुचपत’ने केल्याचे दिसत नाही. आतापर्यंत शंभर टक्के माहिती आपण या अधिकाऱ्यांना दिलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्यावर आलेल्या संकटात माझे कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे. रत्नागिरीसह लांजा-राजापूर मतदार संघातील जनता या सर्व घटना पाहत असून अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे आपल्याकडे भावना व्यक्त केल्या आहेत. जनतेचे पाठबळ असल्याने कोणी कितीही आपल्यावर दबाव आणला तरी आपण उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाच आ. राजन साळवी यांनी व्यक्त केली.