(संगमेश्वर)
शेतकरी कुटुंबास आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबविण्यात येते. संगमेश्वर तालुक्यातून (२०२३-२४ वर्षात) एकूण १९ प्रस्ताव शेतकऱ्यांनी पाठविले होते. एकूण १४ प्रस्ताव मंजूर झाले असून, मंजूर प्रस्तावांपैकी सात मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांना आतापर्यंत १४ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक वयोगटातील एकूण दोन जणांना लाभ देण्यात येतो. या योजनेमध्ये सर्व संवर्गातील शेतकरी लाभासाठी पात्र आहेत. तसेच या योजनेत संबंधित शेतकरी यांना कोणतीही विमा हप्त्याची रक्कम भरणे आवश्यक नाही. या योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांना/ त्यांच्या कुटुंबीयांस एक ते दोन लाखाचे अनुदान देण्यात येते. अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख, अपघातामुळे दोन डोळे किंवा दोन पाय तसेच एक डोळा व हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख, अपघातामुळे एक डोळा अथवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रूपये अनुदान देण्यात येते.
संकटकाळात या योजनेद्वारे मृत/ अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे वारसदार यांना मदत देणारी ही योजना आहे. अधिक माहितीसाठी संगमेश्वर तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.