(रत्नागिरी)
राजापूर लांजाचे आमदार राजन प्रभाकर साळवी, तसेच त्यांची पत्नी अनुजा राजन साळवी, मुलगा शुभम राजन साळवी यांनी रत्नागिरी शहर हद्दीत व रत्नागिरी जिल्हयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्टोबर २००९ ते ०२/१२/२०२२ या कालावधीमध्ये असलेले ज्ञात उत्पन्न, खर्च व मालमत्ता विचारात घेण्यात येवून, त्यांच्या ताब्यात ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त एकुण 3 कोटी 53 लाख 89 हजार 752 रुपये इतकी अपसंपदा म्हणजेच 118.96% अपसंपदा संपदित केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचा समाधानकारक खुलासा त्यांनी सादर केला नसल्याने राजन प्रभाकर साळवी यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ (संशोधन २०१८) चे कलम १३(१)(ब) सह १३(२) प्रमाणे तसेच राजन प्रभाकर साळवी यांची पत्नी अनुजा राजन साळवी, मुलगा शुभम राजन साळवी यांनी नमूद मालमत्ता ही अपसंपदा आहे हे माहित असूनही त्यांनी जाणीवपूर्वक त्याचे स्वतःचे नावे मालमत्ता धारण करून कब्जात बाळगणेकामी राजन प्रभाकर साळवी आमदार, यांना गुन्हा करण्यास प्रोत्साहन दिले. म्हणुन रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर २४/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ (संशोधन २०१८) चे कलम १२ प्रमाणे आज दिनांक १८/०१/२०२४ रोजी ०९:०८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सुशांत चव्हाण पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि रत्नागिरी हे करीत आहेत. त्या अनुषंगाने आमदार राजन साळवी यांचे घर, हॉटेल, कार्यालय व इतर सात संबंधित ठिकाणी एकाच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत घरझडती सुरु करण्यात आली आहे. ही कारवाई सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक सो, लाप्रवि ठाणे परिक्षेत्र ठाणे, अनिल घेरडीकर, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि ठाणे परिक्षेत्र ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सुशांत बं. चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि रत्नागिरी व पथकामार्फत करण्यात येत आहे.