(नवी दिल्ली)
ग्लोबल फायरपॉवर रँकिंगमध्ये अमेरिकेचे सैन्य जगातील सर्वांत शक्तिशाली असल्याचे म्हटले आहे. तर भारत सैन्यशक्तीत जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत रशिया आणि चीन अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर आहे. ग्लोबल फायरपॉवरच्या रँकिंगनुसार भारताला 0.1023 गुण आहे. अमेरिकेला 0.0699, रशियाला 0.0702 आणि चीनला 0.0706 गुण मिळाले आहे. या क्रमवारीत 0.0000 गुण सर्वोत्तम मानले जातात.
ग्लोबल फायरपॉवर 2024 मध्ये एकूण 145 देशांचा समावेश त्यांच्या सैन्यशक्तीच्या आधारे करण्यात आला. भारताचा शेजारी देश पाकिस्तान या यादीत नवव्या, तर इटली दहाव्या क्रमांकावर आहे. कित्येक निकष लक्षात ठेवून ग्लोबल फायरपॉवरने ही यादी तयार केली आहे. यात सैनिकांची संख्या, सैन्य उपकरणे, वित्तीय स्थैर्य, सैन्य संसाधन, नैसर्गिक संसाधन, उद्योग आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करण्यात आला आहे.
आमचे सूत्र लहान पण तांत्रिकदृष्ट्या आधुनिक देशांना मोठ्या आणि तुलनेने कमी विकसित देशांसोबत स्पर्धा करण्यास परवानगी देते, असे ग्लोबल फायरपॉवरने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे. या यादीत फ्रान्स अकराव्या क्रमांकावर आहे. फ्रान्सनंतर ब्राझील, इंडोनेशिया, इराण, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, युक्रेन, जर्मनी आणि स्पेनचा आघाडीच्या 20 देशांमध्ये समावेश आहे.
भूतान सर्वांत कमकुवत देश
ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सनुसार भूतान हा सर्वांत कमकुवत देश आहे. यादीत त्याचा 145 व्या स्थानावर समावेश करण्यात आला आहे. भूताननंतर माल्दोवा, सूरीनाम, सोमालिया, बेनिन, लायबेरिया, बेलिज, सिएरा लिओन, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, आईसलॅण्ड आणि कोसावाचा समावेश आहे.